राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर; दोन टप्प्यांत ७६५ कोटींची मदत; बाधित क्षेत्राची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ७३ कोटी ९१ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ५५३ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी पुढील आठवड्यापासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर; दोन टप्प्यांत ७६५ कोटींची मदत; बाधित क्षेत्राची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी
Published on

मुंबई : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्प्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे. मंजूर निधी पुढच्या आठवड्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. उर्वरित बाधित जिल्ह्यातील पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात असून त्यांनाही पुढील काही दिवसात शासन स्तरावर निधी मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील अमानी गावाला भेट देत बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी कृषी मंत्र्यांनी जाणून घेतल्या.

बाधित शेतकऱ्यांची संख्या जवळपास दोन लाखांहून अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या ऑगस्ट महिन्यातील शेती पीक नुकसानग्रस्त प्रस्तावात १४३ कोटी ६४ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी पुढील काही दिवसांत मंजूर होऊन मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. सप्टेंबरमध्ये एकूण ३८ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे.

६३ लाख ५८ हजार ३०० एकर क्षेत्र बाधित

राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यांतील ६३ लाख ५८ हजार ३०० एकर क्षेत्र बाधित झाले आहे. सरकारने आतापर्यंत पंचनामे पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना निधी मंजूर केला आहे. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत २०५,८१० हेक्टरचे दोन्ही वेळेस आलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पंचनामे केलेला सप्टेंबरचा प्रस्ताव शासनास सादर झाल्यावर वाशिममधील उर्वरित बाधित शेतकऱ्यांनाही तत्काळ मदत मिळणार आहे.

या पिकांचे नुकसान

सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, बाजरी, ऊस, कांदा आणि ज्वारी या पिकांचे नुकसान अधिक आहे. या व्यतिरिक्त काही ठिकाणी भाजीपाला, फळ पिके आणि हळद या पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमध्ये राज्यात प्रामुख्याने खरीप हंगामातील जिरायती, बागायती आणि फळ पिकांना फटका बसला आहे.

या जिल्ह्यांना फटका

नांदेड, वाशिम, यवतमाळ, बीड, वाशीम, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा, अहिल्यानगर, जालना, अकोला, हिंगोली, अमरावती, वर्धा, परभणी, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, सांगली, छ. संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, पुणे, नंदुरबार, रत्नागिरी, रायगड, सातारा, धुळे, लातूर, आणि सिंधुदुर्ग

logo
marathi.freepressjournal.in