रायगड जिल्ह्यातील पोशीर आणि शिलार नदीवर दोन धरण बांधणार; मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगरला अतिरिक्त पाणी मिळणार

वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पोशीर नदीवर १२.३४४ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. याशिवाय, शिलार नदीवर देखील धरण बांधणे प्रस्तावित असून त्यासाठी ४,८६९.७२ कोटी रुपयांच्या निधीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पोशीर नदीवर १२.३४४ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. प्रस्तावित धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी ६३९४.१३ कोटींच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर १२.३४४ टीएमसीचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ९.७२१ टीएमसी आहे. त्यापैकी पिण्यासाठी ७.९३३ टीएमसी आणि औद्योगिक वापरासाठी १.८५९ टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (३३.९६ टक्के, २,१७१.४५ कोटी रूपये), नवी मुंबई महापालिका (४३.५३ टक्के, २,७८३.३७ कोटी रूपये), उल्हासनगर महापालिका (९.५६ टक्के, ६११.२८ कोटी रूपये), अंबरनाथ नगर परिषद (७.०७ टक्के, ४५२.०६ कोटी रूपये), बदलापूर नगर परिषद (५.८८ टक्के, ३७५.९७ कोटी रूपये) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. प्रकल्प राबवण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

प्रकल्प अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीची स्थापना

प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत लाभदायक स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

शिलार नदीवर ४,८६९ कोटींचा धरण प्रकल्प

याशिवाय, रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील शिलार प्रकल्पांतर्गत मौजे किकवी येथील शिलार नदीवर ६.६१ टीएमसी क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित असून त्यासाठी ४,८६९.७२ कोटी रुपयांच्या निधीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातून मुंबई महानगर, पनवेल महापालिका आणि नवी मुंबई महापालिका आदींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in