बारामतीत पुन्हा कौटुंबिक लढत;अजितदादांविरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार, शरद पवार गटाची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी कौटुंबिक लढत पुन्हा एकदा लक्षवेधी ठरणार आहे.
बारामतीत पुन्हा कौटुंबिक लढत;अजितदादांविरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार, शरद पवार गटाची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Published on

मुंबई : महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पहिली ४५ उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यात विद्यमान आमदारांसह नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेच्या बारामती मतदारसंघात अजित पवारांविरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी कौटुंबिक लढत पुन्हा एकदा लक्षवेधी ठरणार आहे.

या यादीत मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबूब शेख यांना बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर अनिल देशमुख यांना काटोलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकूण ४५ नावे जाहीर केली, तर 'काही जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यांची नावे मुंबईतच जाहीर केली जातील', असे त्यांनी सांगितले.

मंदा म्हात्रेंविरुद्ध संदीप नाईक लढत

भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी दिल्याने भाजपमधून बाहेर पडून शरद पवार यांच्या गटात दाखल झालेले गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिल्याने येथील लढत चुरशीची ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in