राज्यभर ‘शक्तिप्रदर्शन’! गुरुपुष्यामृत योग साधत दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली असतानाच, उमेदवारीची माळ गळ्यात पडलेल्या राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी आता नामनिर्देशन पत्र भरण्यातही आघाडी घेतली आहे.
राज्यभर ‘शक्तिप्रदर्शन’! गुरुपुष्यामृत योग साधत दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली असतानाच, उमेदवारीची माळ गळ्यात पडलेल्या राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी आता नामनिर्देशन पत्र भरण्यातही आघाडी घेतली आहे. राज्यात ‘गुरुपुष्यामृत’ योग साधत गुरुवारी बड्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केले. वरळीत आदित्य ठाकरे, मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा, येवल्यातून छगन भुजबळ, तिवसामध्ये यशोमती ठाकूर, आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, ठाण्यात राजन विचारे, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. विशेष म्हणजे, काही जणांना उमेदवारी मिळाली नसतानाही त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

विद्यमान आमदारांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. त्यावेळी ‘विजय आमचाच’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्यामुळे अनेक नेत्यांची धावपळ होणार आहे. त्यामुळे चांगला योग साधून अर्ज दाखल करण्यावर अनेकांचा भर होता. गुरुपुष्यामृत योग साधत अनेकांनी प्रथम देवीदेवतांचे दर्शन घेऊन आपल्या प्रचार अभियानाचा शुभारंभ केला.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची व ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होताच, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही अटीतटीची लढत होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप असा सामना विधानसभा निवडणुकीत रंगणार आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघासाठी कुठल्याच पक्षांकडून संपूर्ण यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र भाजप, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गुरुपुष्यामृताचा योग निवडला. मुंबईसह राज्यभरातून गुरुवारी विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

जिंकण्याची ग्वाही, प्रचंड शक्तिप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवारांनी औक्षण, देवदर्शन अन् रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले व मतदारांना आपणच जिंकणार, अशी ग्वाहीच जणू दिली.

दिग्गज मैदानात

वरळी विधानसभेसाठी शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह इंदापूरमधून राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील, तिवसामधून काँग्रेसकडून यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीकडून मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड, येवलासाठी छगन भुजबळ, कोथरूडसाठी चंद्रकांत पाटील, सांगली इस्लामपूरसाठी जयंत पाटील, बीड परळीसाठी धनंजय मुंडे, आंबेगावसाठी दिलीप वळसे-पाटील, नांदगावसाठी समीर भुजबळ, पंढरपूरसाठी भगिरथ भालके, पाटणसाठी हर्षद कमद आदी उमेवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

ठाण्यातही दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागलेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे, मुंब्रा-कळवा मतदारसंघातून डॉ. जितेंद्र आव्हाड, कल्याण पूर्वमधून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील, शेकापच्या अलिबागच्या उमेदवार चित्रलेखा पाटील, विक्रमगडमधून सुनील भुसारा, बदलापूरमधून किसन कथोरे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

गुरुपुष्यामृताचे महत्त्व

गुरुवारी पुष्य नक्षत्र जुळून आले तर त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत’ योगाची संधी प्राप्त होते. हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो. आज २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी हा योग सुरू झाला. शुक्रवारी पहाटे ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत हा योग होता.

logo
marathi.freepressjournal.in