बारामतीकर युगेंद्रच्या रूपातील नव्या पिढीला स्वीकारतील - शरद पवार

आपण ५७ वर्षांपूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होतो आणि तेव्हापासून मतदारसंघातील जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. कारण बारामतीकर आणि आपले निराळेच बंधन आहे.
युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला
युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला
Published on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांचा नातू युगेंद्र पवार यांनी सोमवारी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. बारामतीकर युगेंद्रच्या रूपातील नव्या पिढीच्या नेतृत्वाचा स्वीकार करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. युगेंद्र पवार यांची लढत काका अजित पवार यांच्याशी होणार आहे.

युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर हजर होते. युगेंद्र पवार यांचे शिक्षण परदेशात झाले असून ते उच्चशिक्षित आहेत. प्रशासनाशीही ते परिचित असून साखर उद्योगाशी संबंधित विषयांचीही त्यांना जाण आहे. बारामतीकर नव्या पिढीच्या नव्या नेतृत्वाचा स्वीकार करतील आणि युगेंद्र यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा आपल्याला विश्वास आहे, असे शरद पवार म्हणाले.

आपण ५७ वर्षांपूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होतो आणि तेव्हापासून मतदारसंघातील जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. कारण बारामतीकर आणि आपले निराळेच बंधन आहे. जनतेशी असलेले बंधन जपावे, नम्र रहावे आणि विनयशीलतेने जनमताचा आदर करावा, अशी आपली तरुण उमेदवारांना सूचना आहे, असेही शरद पवार म्हणाले.

मला आजोबांचा आशीर्वाद - युगेंद्र पवार

आपल्याला आजोबांचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण कठोर परिश्रम करू, असे युगेंद्र पवार म्हणाले. ज्या मतदारसंघात शरद पवार स्वत:चा उमेदवारी अर्ज भरत होते, त्या मतदारसंघात ते अनेक वर्षांनंतर आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले आहेत. त्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे हे आपले भाग्य आहे, असे युगेंद्र म्हणाले.

या मतदारसंघात आपली लढत काका अजित पवार यांच्याशी आहे, ते आव्हान आहे असे विचारले असता युगेंद्र म्हणाले की, आपल्या पाठीशी कोण आहे हे आपल्यासमोरील आ‌व्हानापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. बेरोजगारी, महागाई, पाणीटंचाई, गुन्हेगारीत झालेली वाढ, महिलांवरील अत्याचार आदी महत्त्वाची आव्हाने आहेत, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in