
कराड : विधानसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षा होती, तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. या निकालावर माझ्याकडे काही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे आतापर्यंतची जी व्यवस्था आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात आहे, पण असा निर्णय कधी आला नव्हता. आता आला तर त्याचा अभ्यास करणार, कारणे शोधणार, नक्की कुठे चूक झाली हे समजून घेणार आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागणार आणि उत्साहाने जनतेसमोर जाणार, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलून दाखवला.
‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महायुतीकडून अपप्रचार करण्यात आल्यामुळे त्याचाही काही फटका आम्हाला बसला. यंदा ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना थेट बँक खात्यात रक्कम देण्यात आली. तसेच, आम्ही सत्तेत नसलो तर हे पैसे बंद होतील, असा प्रचार करण्यात आला. त्यामुळे, कदाचित महिलांनी मत महायुतीला दिल्याचे दिसून येत आहे. असे सांगत शरद पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम झाल्याचे मान्य केले. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचे मतदान दोन ते तीन टक्क्याने वाढले. तसेच विरोधकांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिल्यानंतर मी काय करावे हे मी आणि माझे सहकारी ठरवतील, असेही शरद पवार म्हणाले. तरुण आणि कर्तृत्ववान पिढी उभारणे, हा माझा यापुढचा कार्यक्रम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत जनतेने ज्या प्रकारची भूमिका घेतली. त्यामुळे आम्हाला विश्वास होता की, जनता विधानसभेतही आमच्या बाजूने राहील. त्यानुसार आम्ही प्रचार केला. पण अधिक आक्रमक होऊन प्रचार करण्याची गरज होती. मी राज्यात सर्व जिल्ह्यांत फिरलो. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांचाही प्रचार केला. आमचे उमेदवार जिथे होते, तिथे इतर पक्षाचे कार्यकर्ते राबत होते. सर्वांनी कष्ट केले. पण निकाल आमच्या विरोधात गेला, अशी खंत शरद पवार यांनी बोलून दाखवली.
ईव्हीएमबाबत भाष्य करणार नाही!
ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही. त्याबद्दल माझ्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही. आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र, याबाबत जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही, तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. विधानसभेचा निकाल पाहता आम्हाला अधिक काम करण्याची गरज आहे. महायुतीने त्यांचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला, अशी माहिती मला अनेक कार्यकर्त्यांनी दिली, असेही पवार म्हणाले.
‘बटेंगे तो कटेंगे’मुळे मतांचे ध्रुवीकरण
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला. मात्र, त्या नाऱ्यामुळे निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण नक्कीच झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन ज्याप्रकारे प्रचार करत होते, त्याचा निश्चितच फरक पडला, असेही शरद पवार यांनी सांगितले.