मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत तिजोरी उघडत मोदी आणि उद्योगपतीचा फोटो झळकवला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लुटायला तिजोरी कमी पडली म्हणून दिल्लीवरून तिजोरी आणली, अशी चपराक एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना लगावली. दरम्यान, सोयाबीन उत्पादकांना ४,८०० रुपये हमीभाव दिला असून कापूस उत्पादकांना ७,१५२ रुपये हमीभाव देण्यात येईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, कांद्याचा प्रश्न निकाली काढला असून निर्यातीवरील बंदी रद्द केल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात राज्यातील ८ लाख ८९ हजार १०५ कोटींच्या कामांमध्ये स्पीडब्रेकर घातला होता. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, बारसू रिफायनरी, वाढवण बंदर, धारावी पुनर्विकास, गारगाई धरण, मुंबई सेट्रल पब्लिक पार्क अशा प्रकल्पांना स्थगिती दिली. यामुळे जवळपास १४ लाख रोजगार बुडाले आणि दिरंगाईमुळे प्रकल्प खर्चात १५ हजार २०० कोटींची वाढ झाली, असा निशाणा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर साधला. विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता करताना बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अडीच वर्षात महाविकास आघाडीने स्थगिती दिलेले मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो-३, मेट्रो कारशेड, जलयुक्त शिवार योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड, समृद्धी महामार्ग असे प्रकल्प आमच्या सरकारने सुरू केले आणि विक्रमी वेळेत पूर्ण केले. मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण केले. त्यांनी यापूर्वी १५ वर्षात खड्डे बुजवण्यासाठी ३,५०० कोटींचा भ्रष्टाचार केला. कोविड सेंटर, बॉडीबॅग, खिचडी यामधून पैसे खाल्ले, अशी घणाघाती टीका शिंदे यांनी ठाकरेंवर केली.