वक्फ कायद्यात सुधारणा करणारच; अमित शहा यांची ग्वाही; नक्षलवाद्यांच्या बीमोडाचा पुनरुच्चार

Maharashtra assembly elections 2024 : nराष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांचा विरोध असला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्फ कायद्यात सुधारणा करतीलच, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे दिली.
वक्फ कायद्यात सुधारणा करणारच; अमित शहा यांची ग्वाही; नक्षलवाद्यांच्या बीमोडाचा पुनरुच्चार
Published on

यवतमाळ : राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांचा विरोध असला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्फ कायद्यात सुधारणा करतीलच, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे दिली.

मोदी यांना वक्फ मंडळ कायद्यात बदल करावयाचा आहे, परंतु उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्याला विरोध करीत आहेत, असेही उमरेड येथील एका जाहीर सभेत शहा म्हणाले.

तथापि, तुम्ही कितीही विरोध करा, मोदी वक्फ कायद्यात बदल करणारच, असे गृहमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

विधानसभेच्या निवडणुकीत दोन गट आहेत. महायुती हा पांडवांचा गट आहे, तर महाविकास आघाडी हा कौरवांचा गट आहे. उद्धव ठाकरे आपलीच शिवसेना खरी असल्याचे म्हणतात, मग खरी शिवसेना औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्यास विरोध करील का, असा सवालही शहा यांनी केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे जनतेच्या खात्यांमध्ये त्वरित पैसे जमा होणार असल्याचे सांगतात, मात्र तुम्ही कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामध्ये आश्वासनांची पूर्तता केली नाही.

चंद्रपूर येथील सभेत शहा म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधील नक्षलवादाचा पूर्ण बीमोड करण्याचे ठरविले आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद यापासून देशाला मुक्त करण्याचा निर्धार मोदी यांनी केला आहे. छत्तीसगडमध्ये आता जेवढा नक्षलवाद उरला आहे त्याचा ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण नायनाट केला जाईल, असेही ते म्हणाले.

स्वा. सावरकर, बाळासाहेबांबद्दल राहुल यांनी चांगले बोलावे

राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वा. सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चांगले बोलून दाखवावे, असे आव्हान शहा यांनी शुक्रवारी हिंगोली येथील सभेत दिले. उद्धव ठाकरे जर तुमच्यात धैर्य असेल तर तुम्ही राहुल गांधी यांच्याकडून स्वा. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चार चांगले शब्द वदवून घ्यावेत, असेही गृहमंत्री म्हणाले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी, राहुल यांनी विमान २० वेळा उतरविण्याचा प्रयत्न केला, मात्र हे विमान कोसळले आणि आता २१ व्या वेळीही ते कोसळणारच आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मार्गात काँग्रेसने ७० वर्षे अडथळे आणले, मात्र मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केलीच, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in