माढा : आम्हाला ४० वर्षे साथ दिली म्हणतात, पण ते आता सोडून गेले आहेत. त्यांचे काय करायचे? एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुधं पाडायचं नाही. लोळत पाडायचं, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. कोणाचाही नाद करा, पण शरद पवारांचा नाद करायचा नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बंडखोरी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना जोरदार इशारा दिला.
माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या टेंभुर्णीतील सभेत शरद पवार यांनी १९८०च्या विधानसभा निवडणुकीचा किस्सादेखील सांगितला. “१९८० साली माझे असेच ५८ आमदार निवडून आले होते. मी तेव्हा परदेशात गेलो आणि परत आल्यावर पाहतो तर ५८ पैकी ५२ आमदार मला सोडून गेले होते. मग तीन वर्षे मी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सर्व नवीन दमाचे उमेदवार उभे केले. मला सोडून गेलेल्या ५२ पैकी एकही आमदार परत निवडून आला नाही. मग आता हे जे सोडून गेलेले आहेत त्यांचे काय करायचे? असा सवाल त्यांनी जनतेला केला. त्यावर जनतेतून ‘सगळे पाडायचे’ असे उत्तर आले.
“राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोदींनी उद्योगपतींचे १६ हजार कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे ५ ते १० हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. गेल्या २ वर्षात महाराष्ट्रात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले आहेत. म्हणजेच दर तासाला पाच महिलांवर या महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील ६४ हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत. तसेच ६२ लाख मुले राज्यात बेरोजगार आहेत. शिंदे-फडणवीस अशा राज्यकर्त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांची कानउघाडणी केली.