शिंदेंचाही घराणेशाहीवर भरवसा; ४५ उमेदवार जाहीर, माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर!

‘मविआ’तील घराणेशाहीवर टीका करणाऱ्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी घराणेशाहीवरच भरवसा ठेवला आहे. भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली.
शिंदेंचाही घराणेशाहीवर भरवसा; ४५ उमेदवार जाहीर, माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर!
Published on

मुंबई : ‘मविआ’तील घराणेशाहीवर टीका करणाऱ्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी घराणेशाहीवरच भरवसा ठेवला आहे. भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. शिंदेंच्या शिवसेनेच्या पहिली यादीत फक्त तीन महिलांना स्थान मिळाले आहे.

महिनाभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी अखेर शिवसेना शिंदे गटातर्फे मंगळवारी रात्री उशिरा ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच पक्षातील अनेकांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली त्यातही घराणेशाहीला पसंती दिली. घराणेशाहीच्या नावाने ओरड करणाऱ्या या पक्षांनी आपल्या यादीतून नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊन तीच परंपरा जपली आहे.

घराणेशाहीतील उमेदवार

चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल पाटील, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ, पैठणमधून खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विकास भुमरे, जोगेश्वरी (पूर्व) मतदारसंघातून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर, राजापूर मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत, खानापूर मतदारसंघातून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना तिकीट देण्यात आले आहे.

माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या पहिल्या यादीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे तेथे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार उभा केला जाणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, पहिल्या यादीत शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने तेथे अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर असा सामना रंगणार आहे.

फक्त तीन महिलांना स्थान

शिंदेंच्या शिवसेनेच्या पहिली यादीत फक्त तीन महिलांना स्थान मिळाले आहे. यात साक्री येथून मंजुळा गावीत, जोगेश्वरी (पूर्व) मतदारसंघातून मनीषा वायकर आणि भायखळ्यातून यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in