एक पुरावा आणा, मतदान करा! राज्य निवडणूक आयोगाचे मतदारांना ID बाबत आवाहन; आधार, DL ग्राह्य धरता येणार

ओळखपत्र नसल्यास १२ प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरीत करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरीत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, तसेच...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे.

२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट अशा १२ पुराव्यापैकी एक आणा आणि बिनधास्त मतदान करा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठयांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल.

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

ओळखपत्र नसल्यास...

ओळखपत्र नसल्यास १२ प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरीत करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरीत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरीत केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरीत केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरीत केलेले विशेष ओळखपत्र हे १२ पुरावे ग्राहा आहेत.

logo
marathi.freepressjournal.in