मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा तिढा बराच काळ सुरूच राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय बनला होता. अखेर आता जागावाटपाबाबत ‘आमचं ठरलं’ असे महायुती आणि महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार आहे, तर दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून महायुतीची यादीही बुधवारीच जाहीर होणार आहे.
भाजपने जागावाटपाआधीच ९९ जणांची यादी जाहीर केली असून महायुतीत भाजपच मोठा पक्ष ठरणार आहे. जागावाटपात भाजपला १५२ ते १५५, शिवसेना शिंदे गटाला ७८-८० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ५२-५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्येही जागावाटपाबाबत आता एकमत झाले असून काँग्रेस १०० ते १०५, शिवसेना ठाकरे गट ९०-९५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ८० ते ८५ जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
“महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला असून बुधवारी महायुतीची यादी जाहीर होईल,” अशी माहिती भाजपचे नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दरम्यान, भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून उर्वरित जागांची यादी शिवसेना आणि अजित पवार यांच्या जाहीर होणाऱ्या यादीबरोबर होईल, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पहिली यादी जाहीर झाली. मात्र, महायुतीतील शिवसेना, अजित पवार गट नाराज असल्याचे बोलले जात असून त्यांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीत अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा मंगळवारी उशिरा निकाली निघाला असून बुधवारी मविआची पहिली यादी जाहीर होईल, असे मविआतील नेत्यांनी सांगितले. विदर्भातील काही जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमधील वाद विकोपाला गेला होता. हा तिढा काँग्रेस हायकमांडकडे गेल्यानंतर जागावाटपाच्या समन्वयाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आल्यावर यावर तोडगा निघाल्याचे समजते.
काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार
दरम्यान, भाजपमधील सूत्रांनी सांगितले की, “शिवसेना आणि अजित पवार यांच्या पक्षांसह भाजपची दुसरी यादी बुधवारी जाहीर होईल.” दुसरीकडे मविआतही जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले असून काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार असल्याचे सांगण्यात येते, त्यापाठोपाठ ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष उर्वरित जागा लढवणार असल्याचे मविआकडून सांगण्यात आले.
कुणाला किती जागा?
महायुती
-भाजप १५२-१५५
-शिवसेना (शिंदे) ७८-८०
-राष्ट्रवादी (अजित पवार ) ५२-५४
महाविकास आघाडी
-काँग्रेस १००-१०५
-शिवसेना (ठाकरे गट) ९०-९५
-राष्ट्रवादी (शरद पवार) ८०-८५