याद्यांचा धडाका! महायुती व महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार जाहीर

Maharashtra Elections 2024 : रविवारी शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच अजित पवार गट यांनी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तर शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसने आपली तिसरी व रविवारी चौथी यादी जाहीर केली.
याद्यांचा धडाका! महायुती व महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार जाहीर
Published on

मुंबई : एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा उमेदवारी यादी जाहीर करण्याचा धडाका राजकीय पक्षांनी लावला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने रविवारी बहुतांश जागांवरील उमेदवार जाहीर केले असले तरी काही जागांबाबत अद्याप घासाघीस सुरूच आहे. रविवारी शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच अजित पवार गट यांनी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तर शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसने आपली तिसरी व रविवारी चौथी यादी जाहीर केली. मात्र, काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होताच कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला असून २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.‌ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून उर्वरित उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास वेग आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन तिसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत ७६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. आता तिसऱ्या यादीत ९ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

धनंजय मुंडेंविरुद्ध शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख

मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून शरद पवार गटाने राजेसाहेब देशमुख यांना उतरवले आहे. तर माजलगावमध्ये अजित पवार यांच्या आमदार प्रकाश सोळंके यांना मोहन जगताप टक्कर देणार आहेत. तर अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक यांच्याविरुद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांना अणुशक्ती नगरमधून तिकीट देण्यात आले आहे. आता स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद रिंगणात उतरल्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. अणुशक्ती नगरमधून उमेदवारी मिळालेले फहाद अहमद यांनी २०२२ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून फहाद अहमद राजकारणात सक्रिय आहेत. फहाद अहमद यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीबद्दल आंदोलन केले होते. याशिवाय फहाद अहमद यांनी सीएए कायद्याच्या विरोधातील रॅलींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.

शरद पवार गटाकडून ११ महिलांना उमेदवारी

मोहोळ मतदारसंघातून सिद्धी कदम हिला उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाकडून एकूण ११ महिलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम

नवाब मलिक आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे आम्ही चर्चा करण्यासाठी भेटत असतो. मात्र नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलणे टाळले. तर दुसरीकडे नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

यात फलटणमधून सचिन पाटील, विजयसिंह पंडित यांना गेवराईतून, निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पारनेरमधून काशिनाथ दाते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलीप बनकर यांच्यावरच दुसऱ्यांदा विश्वास ठेवला आहे. भाजपचे यतिन कदम यांनीही या जागेवर दावा केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी या जागेबाबतत्त अजित पवार यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असेल याबाबत चर्चा सुरू होती. आता मात्र निफाड या जागेसाठी अजित पवार यांच्या पक्षाचे दिलीप पाटील हेच उमेदवार असणार आहेत. याआधी अजित पवार गटाच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आता तिसऱ्या यादीतून चार उमेदवार मिळाल्यानंतर राष्ट्रवादीने आतापर्यंत एकूण ४९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे निलेश लंके यांनी जत नगरमधून शरद पवार गटाचे भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पारनेर विधानसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी पत्नी राणी लंके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाने काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचे १५ उमेदवाराची तिसरी यादी

काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा तिसरी यादी जाहीर केली आहे. सांगलीमध्ये झालेल्या वादानंतर काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना संधी दिली आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने तिसऱ्या यादीत गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंतचे १५ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वांद्रे पश्चिम येथून असिफ झकेरीया, दिग्रज येथून ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.

काँग्रेसची चौथ्या यादीत अमळनेर - डॉ. अनिल शिंदे, उमरेड - संजय मेश्राम, अरमोरी - रामदास मेश्राम, चंद्रपूर - प्रवीण पडवेकर, बल्लारपूर - संतोषसिंह रावत, वरोरा - प्रवीण काकडे, नांदेड(उत्तर) - अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, औरंगाबाद (पू.) - लहू शेवाळे, नालासोपारा - संदीप पांडे, शिवाजीनगर - दत्तात्रय बहीराट, पुणे कन्टोमेंट - रमेश बागवे, सोलापूर (दक्षिण) - दिलीप माने, पंढरपूर - भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे.

सचिन सावंत यांचा लढण्यास नकार

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत प्रवक्ते सचिन सांवत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना वांद्रे येथून निवडणूक लढवायची होती. मात्र, ही जागा उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यांनी काल ट्विट करत अंधेरीतून लढण्यास नकार देत मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर या जागेवर आता कॉंग्रेसने अशोक जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांच्याऐवजी आता अशोक जाधव

काँग्रेसने आपल्या १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात अंधेरी (प.) येथून अशोक जाधव यांना उमेदवारी दिली आहे. कॉग्रेसने दोन उमेदवारांच्या जागांमध्ये बदल केला आहे. यामध्ये अंधेरी पश्चिम येथे सचिन सावंत यांना देण्यात आलेली उमेदवारी बदलून तेथे अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद पूर्व येथे मधुकर देशमुख यांच्याजागा लहू शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोल्हापूरात दगडफेक

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नाराज झालेल्या काही अज्ञात कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच कार्यालयावरील काँग्रेसच्या चिन्हाला काळे फासत ‘चव्हाण पॅटर्न’ असा मजकूर लिहिला. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दगडफेक करणाऱ्या अज्ञात लोकांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव या विद्यमान आमदार आहेत. २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. दरम्यान, यावेळी काँग्रेसने उमेदवार बदलून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली आहे.

या दुसऱ्या यादीत अनेक महत्त्वाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. अक्कलकुवा - आमश्या पाडवी, बाळापूर - बळीराम शिरसकर, रिसोड - भावना गवळी, हदगाव - बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण - आनंद तिडके पाटील (बोंडारकर), परभणी - आनंद शेशराव भरोसे, पालघर - राजेंद्र घेड्या गावित, बोईसर (अज) - विलास सुकुर तरे, भिवंडी ग्रामीण (अज) - शांताराम तुकाराम मोरे, भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी, कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर, अंबरनाथ (अजा) - डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर, विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे, दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम, अंधेरी पूर्व - मुरजी कांनजी पटेल, चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते, वरळी - मिलींद मुरली देवरा, पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे, कुडाळ - निलेश नारायण राणे, कोल्हापुर उत्तर - राजेश विनायक क्षिरसागर यांना उमेदवारी जाहीर केली.

वरळीतून मिलिंद देवरा, निलेश राणे, निरुपम यांना शिंदे गटाची उमेदवारी

शिवसेना नेते (उबाठा) आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आता शिवसेनेने (शिंदे) मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. तर कुडाळमधून निलेश राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कुडाळमध्ये वैभव नाईकविरुद्ध निलेश राणे अशी लढत होणार आहे. तर संजय निरुपम यांना दिंडोशीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील शिवसेनेने (शिंदे) रविवारी दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली.

logo
marathi.freepressjournal.in