‘मविआ’चे समान जागावाटप; काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट प्रत्येकी ८५ जागा लढवणार, १८ जागा मित्रपक्षांना, १५ जागांबाबत उत्सुकता

Maharashtra Assembly Elections 2024 : ‘मविआ’त २७० जागांबाबत सहमती झाली असून, १८ जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, प्रत्येकी ८५ जागांच्या फॉर्म्युलाप्रमाणे एकूण जागा २५५ होतात, त्यामुळे १५ जागांबाबत तिढा कायम असल्याचे सूचित होत आहे.
‘मविआ’चे समान जागावाटप; काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट प्रत्येकी ८५ जागा लढवणार, १८ जागा मित्रपक्षांना, १५ जागांबाबत उत्सुकता
Published on

मुंबई : ‘मविआ’च्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा अखेर बुधवारी संपली. ‘मविआ’तील प्रमुख पक्ष कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट प्रत्येकी ८५ जागा लढवणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘मविआ’च्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. ‘मविआ’त २७० जागांबाबत सहमती झाली असून, १८ जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, प्रत्येकी ८५ जागांच्या फॉर्म्युलाप्रमाणे एकूण जागा २५५ होतात, त्यामुळे १५ जागांबाबत तिढा कायम असल्याचे सूचित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांनी ‘मविआ’चे जागावाटप जाहीर करण्याचे निर्देश दिल्यानंतर ‘मविआ’ने तातडीने पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केले. महाविकास आघाडीचा ८५+८५+८५ असा फॉर्म्युला ठरला असून उर्वरित जागा मित्र पक्षांना सोडणार, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीची २७० जागांवर सहमती झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मित्रपक्ष असलेल्या शेकाप, सपा व इतरांना जागा देण्याबाबत गुरुवारी चर्चा होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी महाविकास आघाडीचे जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरु होते. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जागावाटपावर योग्य निर्णय घेण्यास विलंब होत होता. मात्र, महायुतीतील भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीही पहिली यादी जाहीर झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही ३८ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर केली. त्यामुळे ‘मविआ’वर जागावाटप जाहीर करण्यासाठी दबाव वाढू लागला होता.

दरम्यान, महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिघाडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. अखेर बुधवारी सायंकाळी ‘मविआ’चे नेते संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदींनी पत्रकार परिषद घेत मविआचा फॉर्म्युला जाहीर केला.

logo
marathi.freepressjournal.in