'विशिष्ट वळणावर थांबलेच पाहिजे...' ; संसदीय राजकारणातून निवृत्तीचे शरद पवार यांचे संकेत

जवळपास साडेपाच दशकांच्या दीर्घ राजकीय प्रवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे स्पष्ट संकेत येथे दिले.
'विशिष्ट वळणावर थांबलेच पाहिजे...' ; संसदीय राजकारणातून निवृत्तीचे शरद पवार यांचे संकेत
Published on

पुणे : जवळपास साडेपाच दशकांच्या दीर्घ राजकीय प्रवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे स्पष्ट संकेत येथे दिले. विशिष्ट वळणावर थांबलेच पाहिजे, असे म्हणत शरद पवार यांनी राज्यसभेची वर्तमान मुदत संपल्यावर पुन्हा एकदा त्या सभागृहात जावयाचे की नाही याचा विचार करणार असल्याचे सांगितले.

बारामती विधानसभा मतदारसंघात आपले नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी आलेल्या शरद पवार यांनी नव्या नेतृत्वाला वाट मोकळी करून देण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या राजकीय कारकीर्दीत १४ निवडणुका जिंकल्याचेही ते म्हणाले. सर्वप्रथम आपण राज्य विधानसभेवर निवडून आलो, त्यानंतर राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, चार वेळा मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, केंद्रीय कृषिमंत्री अशी विविध पदे भूषविली आणि सध्या आपण राज्यसभेचे सदस्य असल्याचे पवार म्हणाले.

अनेक विकासकामे केली

आपण ज्या पदांवर होतो त्या कारकीर्दीत अनेक विकासकामे झाली. शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, कृषिमालास दर वाढविण्यासाठी काम केले, कृषी निर्यातीला चालना दिली, संरक्षण मंत्री असताना महिलांना सशस्त्र दलात संधी दिली, राज्याचा मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के प्रतिनिधित्व दिले, असेही पवार म्हणाले.

अजितदादांमुळे बारामतीतील पाणी उपसा प्रकल्प अपूर्ण

पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याच्या टंचाईकडे लक्ष न दिल्याबद्दल शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री असताना आपण बारामतीमधील जनाई शिरसाई पाणी उपसा प्रकल्पाला मान्यता दिली, मात्र अजित पवार यांनी ते काम पूर्ण केले नाही. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आता नव्या नेतृत्वाची गरज आहे.

कोणालाही भावनिक करण्याची गरज नाही

अजित पवार विविध सभांमध्ये शरद पवार तुम्हाला भावनिक करतील असे सांगत आहेत, त्या विषयाचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले, काही लोक सांगतात मी भावनिक होईल. भावना वगैरे काही नसतात. लोकांच्या मनात जे आहे त्यालाच लोक निवडून देतात. दुसरं काही कारण नाही, कोणालाही भावनिक करण्याची काही गरज नाही. मला आता आमदारकी नको. खासदारकी नको. आता इथल्या लोकांची राहिलेली कामे सोडवणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे यासाठी आपल्या हातात राज्य हवे, यासाठी युगेंद्रला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

नव्या नेतृत्वाला संधी देणार

नव्या नेतृत्वाला संधी मिळावी यासाठी आपण काही वर्षांपूर्वी लोकसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवरील राजकारणापासून दूर राहून ती जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपविली. त्यानंतर अजित पवार यांनी ही जबाबदारी पार पाडली. आता नव्या नेतृत्वाची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ नेते म्हणाले.

मात्र, सामाजिक जीवनातून निवृत्ती नाही

मतदारांनी आपल्याला घरीच पाठविले नाही. त्यामुळे आता कोठेतरी थांबलेच पाहिजे आणि म्हणूनच नवे नेतृत्व आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र याचा अर्थ आपण सामाजिक जीवनातून निवृत्त होणार नाही, सत्तेमध्ये नसलो तरी दुष्काळी प्रदेश, समाजातील उपेक्षित वर्ग यांच्यासाठी काम करीतच राहणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in