Maharashtra assembly elections 2024: आता ‘त्यांना’ टकमक टोक दाखवायचे आहे - उद्धव ठाकरे

गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर, झाडी पाहिली, मात्र आता त्यांना टकमक टोक दाखविण्याची वेळ आली आहे, असा हल्ला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिंदे गटावर चढविला. सांगोला येथे शिवसेनेची (उबाठा) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती तेव्हा ते बोलत होते.
Uddhav Thackeray
संग्रहित छायाचित्र
Published on

सांगोला : गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर, झाडी पाहिली, मात्र आता त्यांना टकमक टोक दाखविण्याची वेळ आली आहे, असा हल्ला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह शिंदे गटावर चढविला. सांगोला येथे शिवसेनेची (उबाठा) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती तेव्हा ते बोलत होते.

रेल्वेत जर कोणाची ओळख असेल तर त्यांनी आपल्याला २३ तारखेचे गुवाहाटीचे तिकीट काढू द्यावे, कारण एकाला तेथे पाठवायचे आहे, मग तिकडे जाऊन त्याने झाडे मोजत बसावे, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव यांनी शिंदे गट आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली.

महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, मला गद्दारांना सांगायचे आहे की त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचे टकमक टोक पाहिलेले नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.

अमित शहा 'सर्किट'

ठाकरे यांनी यावेळी अमित शहा यांनाही लक्ष्य केले. आज पंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात फिरत आहेत. 'लगे रहो मुन्नाभाई'मधील सर्किटसारखी त्यांची अवस्था आहे. इथे येऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी ते काश्मीरमधील कलम ३७० बद्दल बोलतात. माझ्यावर टीका करताना, आम्ही कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर आहोत, असे ते म्हणतात, पण कदाचित अमित शहा यांना स्मृतिभ्रंश झाला असावा, कारण ज्यावेळी कलम ३७० रद्द झाले त्या निर्णयाला आम्हीसुद्धा समर्थन दिले होते, असेही ठाकरे म्हणाले.

किती काश्मिरी पंडितांना घरे मिळाली

कलम ३७० रद्द केल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा स्वत:ची पाठ थोपटवून घेत आहेत. मात्र, ज्यावेळी काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत होते. त्यांची घरे जाळली जात होती. तेव्हा मोदी आणि शहा हे नाव कुणाला माहितीही नव्हते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. त्यावेळी त्यांच्याकडे सत्ताही नव्हती. पण आज मोदी आणि शहा केंद्रात सत्तेत आहेत. मग त्यांनी ३७० रद्द केल्यानंतर किती काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये घरे मिळवून दिली हे त्यांनी सांगावे, असा सवालही त्यांनी भाजपला विचारला.

मूलभूत प्रश्न

आज महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजप त्यांना काश्मीरमधील ३७० रद्द केल्याचे आणि राम मंदिर बांधल्याचे सांगत आहेत. राज्यातल्या मूलभूत प्रश्नांवर भाजप बोलत नाही. आज महायुतीकडून मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या महाराष्ट्रातील इतर शहरातील सातबाराही अदानींच्या नावे होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in