मविआच्या गाडीला ना चाके, ना ब्रेक! चालकाच्या आसनासाठीही रस्सीखेच; धुळे येथील प्रचारसभेत मोदींची टीका

राज्यात विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या गाडीला चाके नाहीत आणि ब्रेकही नाही, चालकाच्या आसनासाठीही तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. जनता आमच्यासाठी ईश्वर आहे, आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणामध्ये आलो, मात्र महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केली.
मविआच्या गाडीला ना चाके, ना ब्रेक! चालकाच्या आसनासाठीही रस्सीखेच; धुळे येथील प्रचारसभेत मोदींची टीका
Published on

धुळे/नाशिक : राज्यात विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या गाडीला चाके नाहीत आणि ब्रेकही नाही, चालकाच्या आसनासाठीही तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. जनता आमच्यासाठी ईश्वर आहे, आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणामध्ये आलो, मात्र महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केली. दरम्यान, जगातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ लागू करू शकत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मोदी यांनी धुळ्यातून फोडला, त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेमध्ये भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचे अडीच वर्षांचे शासन बघितले आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटले, त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचे काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महायुती सरकारच्या केंद्रस्थानी महिला आहेत. कारण महिलांचा विकास झाला, तरच समाजाचा विकास होतो. त्यामुळे आम्ही महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही ‘लाडकी बहीण’सारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही देशभरात सुरू आहे. मात्र, काँग्रेस आणि महाविकास आघाडी नेते ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांचे काही लोक न्यायालयातही जाऊन आले. त्यांना महिलांचा झालेला विकास पचनी पडत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला

गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने विकासकामांचा नवा उच्चांक गाठला आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पुन्हा गौरव मिळाला आहे. भाजप महायुती आहे, तर गती आहे आणि तरच महाराष्ट्राची प्रगती आहे. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आम्ही पूर्ण केली. दुसरीकडे काँग्रेसने राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले हाच त्यांचा खरा चेहरा आहे, असेही ते म्हणाले.

...तर दुकान बंद होईल!

काँग्रेस जातीजातीत भेद निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वंचितांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण दिले. त्यानंतर इंदिरा गांधींनीही एससी, एसटींना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी प्रयत्न केले. एससी, एसटी, ओबीसी हा समाज मजबूत झाला तर काँग्रेसच्या राजकारणाचे दुकान बंद होईल हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते त्यांच्या आरक्षणाला विरोध करतात, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.

कुणीही ‘कलम ३७०’ पुन्हा लागू करू शकत नाही

जगातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ लागू करू शकत नाही, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने धर्माचे राजकारण केले. त्यामुळे भारताची फाळणी झाली आणि आता ते जातीचे राजकारण करीत आहेत. देशाविरुद्ध यापेक्षा कोणतेही मोठे कारस्थान असू शकत नाही, असेही ते म्हणाले.

एक है तो सेफ है!

काँग्रेस पक्ष जातीजातींमध्ये झुंज लावत असल्याचा आरोप मोदी यांनी केला आणि ‘एक है तो सेफ है’ असे सांगत सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध उभे करणे हा काँग्रेसचा एकमेव कार्यक्रम आहे. एससी, एसटी आणि ओबीसी यांचा विकास होऊ नये असे काँग्रेसला वाटते. त्यामुळे ‘एक है तो सेफ है’ हे ध्यानात ठेवावे. पंडित नेहरू यांच्या काळापासून काँग्रेसने आरक्षणाला विरोध केला आहे आणि आता चौथी पिढी (युवराज) जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मोदी म्हणाले.

पंडित नेहरू ते राहुल गांधी सारेच आरक्षणविरोधी!

नाशिक : काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी झुंजवण्याचा धोकादायक खेळ खेळला जातोय. काँग्रेस कधीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना पुढे येताना पाहू शकत नाही. हाच काँग्रेसचा इतिहास आहे. स्वातंत्र्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शोषितांना, वंचितांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नेहरू त्याला विरोध करत होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या जाहीरसभेत केला.

सशक्त भारतात नाशिकची महत्त्वाची भूमिका

महायुती सरकारच्या विकासाच्या अजेंड्यावर नाशिकला मोठे महत्त्व मिळाले आहे. हायवे बनत आहे, वाहतूक व्यवस्था होत आहे. २०२६ च्या कुंभमेळ्यात देखील याचा फायदा होईल. नाशिकमधील आयटी पार्क रोजगार तयार करेल. नाशिक डिफेन्स क्षेत्रात मोठे केंद्र देखील बनतोय. नाशकात सुरक्षेची उपकरणे बनवली जात आहेत. नाशिक सशक्त भारतात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काँग्रेस आणि आघाडीवाले लोक देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिफेन्समध्ये कमकुवत करण्यासाठी ‘एचएएल’संदर्भात खोटा प्रचार केला. धरणे आंदोलन केले, कर्मचाऱ्यांना भडकवले. मात्र ‘एचएएल’ रेकॉर्ड ब्रेक कामे करत आहे. नाशिक त्याचे परिणाम बघत आहे, असे मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकला माझा नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्या दिवशी मला नाशकात येण्याचे सौभाग्य मिळाले. अयोध्येत प्राणप्रतिष्ठेआधी ११ दिवसांच्या अनुष्ठानाची माझी सुरुवात नाशिकमधून करण्यात आली होती. काळाराम मंदिरात मला सेवेचा लाभ मिळाला. विकसित महाराष्ट्र, भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय.

डबल इंजिन सरकारमध्ये विकासाची गती डबल होते. योजनांचा लाभ पण डबल होता. येथे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान, नमो शेतकरी सन्मान निधी मिळत आहे. वर्षाला १२ हजारांची मिळणारी मदत वाढवून १५ हजार करण्यात येणार असल्याचे मोदी म्हणाले. तसेच मी कांदा उत्पादकांची भावना समजतो. त्यासाठी कांदा निर्यातीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

येथे सोयाबीन, कापूस, धान आणि दुधाचे उत्पादन घेतले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्रँडिंग वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. इथेनॉल खरेदीसाठी शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांत सुमारे ८० हजार कोटी रुपये मिळाले आहेत. देशाचा पैसा पेट्रोल घेण्यासाठी विदेशात जायचा. आता ते पैसे माझ्या देशातील शेतकऱ्यांना मिळत आहेत, असे मोदी म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in