विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या कारभाराची पोलखोल सुरू आहे. महायुतीने अडीच वर्षांत काय केले, तर मविआने अडीच वर्षांच्या काळात काय केले याचाच लेखाजोखा जनतेसमोर मांडत आपणच जनतेचे कैवारी असल्याचा आव आणला जात आहे. निवडणुकीत विजयी करा यासाठी अमिष दाखवत आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या, वाढते प्रदूषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई या समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे निवडणूक म्हणजे राजकीय पक्षांसाठी राजकीय खेळ झाला आहे, असे मत राज्यातील जनतेने व्यक्त केले आहे.
निवडणुका जवळ आल्या की, आम्हीच जनतेचे कैवारी असा टेंभा राजकीय पक्षांकडून मिरवला जातो. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ता काबीज करण्यासाठी मविआ आणि महायुती दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर तुटून पडत आहेत. नाममात्र दरात जागा, लाडकी बहिण योजनेंतर्गत करदात्यांच्या पैशांची उधळण, निवडणुकीत अमुक अमुक केले हेच आरोप करत महायुती आणि मविआने प्रचारात मतदारांच्या डोळ्यात धूळफेक केली, असा मतदारांनी व्यक्त केला आहे.
दर्जेदार आरोग्य सेवा, खड्डे मुक्त रस्ते, पिण्याचे मुबलक पाणी, कचरा मुक्त मुंबई याच मापक अपेक्षा मतदारांच्या. खड्डेमय प्रवास हा वर्षानुवर्षे मतदारांच्या नशीबी, आरोग्य सुविधांसाठी भटकंती, मुबलक पाण्यासाठी वणवण, रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग हेच मतदार राजाच्या पदरी पडते. परंतु निवडणुका जवळ आल्या की, घोषणांचा पाऊस पाडायचा आणि मतदार राजावर सोयीसुविधांचा वर्षांव करायचा यात राजकीय नेते मंडळी तरबेज. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार राजाला आकर्षित करण्याची एकही संधी नेते मंडळी सोडत नाहीत, हे नेते मंडळींचे कौशल्य. त्यामुळे निवडणुकीचा बार अन् विकासाची ओरड हे फक्त अन् फक्त खुर्चीच्या लालसेपोटी ये 'पब्लिक हैं सब जानती हैं!
फक्त १ टक्का समाजकारण
निवडणुका म्हणजे आपला हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून पाठवायचा हा मुख्य उद्देश निवडणुकांचा. मात्र निवडणुकांचा पॅटर्न बदलत असून नेते मंडळी स्वतःचा अन् पक्षाचा कसा फायदा होईल याचा विचार करत निवडणुका घेत असल्याचे दिसून येते. सत्ता बदल झाला की, पाय उतार झालेल्या सत्ता पक्षाचे निर्णय बदल करत निर्णय जनतेवर थोपवायचे ही प्रथा गेल्या काही वर्षांत राज्यात सुरू आहे. पक्ष आणि आपले अर्थपूर्ण राजकारण हाच सर्वपक्षीय नेते मंडळींचा उद्देश, त्यामुळे सध्याच्या घडीला ९९ टक्के राजकारण अन् १ टक्का समाजकारण होत आहे.