मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

Maharashtra assembly elections 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा रणसंग्राम बुधवारी संपल्यानंतर आता राज्यभरासह देशातील जनतेच्या नजरा शनिवारच्या निकालाकडे लागल्या आहेत. त्यातच यंदा राज्यात गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक ६६ टक्के मतदान झाल्यामुळे कोणाचे सरकार सत्तेवर येणार, हा अंदाज वर्तवणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्तेच्या सारीपाटावर ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ हा ‘खेळ’ सुरू झाला आहे
मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा रणसंग्राम बुधवारी संपल्यानंतर आता राज्यभरासह देशातील जनतेच्या नजरा शनिवारच्या निकालाकडे लागल्या आहेत. त्यातच यंदा राज्यात गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक ६६ टक्के मतदान झाल्यामुळे कोणाचे सरकार सत्तेवर येणार, हा अंदाज वर्तवणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्तेच्या सारीपाटावर ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ हा ‘खेळ’ सुरू झाला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या काटेरी सिंहासनावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये निकालापूर्वीच रणकंदन सुरू झाले आहे. महायुतीकडून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे दावे त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत असून, महाविकास आघाडीमध्ये केवळ काँग्रेस सध्या मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे.

राज्यात सध्या महायुतीलाच सरकार स्थापनेची संधी मिळेल, असे बहुतांशी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) दिसत असल्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात जास्त चुरस रंगली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा दावा केल्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्येच या मुद्द्यावरून रण तापले आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे बावनकुळे यांनी म्हटल्यानंतर त्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, असे बावनकुळे यांना वाटणे स्वाभाविक आहे. पण महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांचा हक्क आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले. तर राज्यात एकहाती सरकार येणे शक्य नाही. दोन-चार जागांच्या फरकाने महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. येत्या २५ नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सत्तास्थापनेत अजित पवार हेच किंगमेकर ठरतील, असा दावा मिटकरी यांनी केला आहे.

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. निकाल आल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र बसून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट करत महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील हवा काढून घेतली आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मोजक्या एजन्सीजनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असे अंदाज वर्तवल्यामुळे महाविकास आघाडीकडून मात्र मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार घमासान पाहायला मिळाली नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेस अग्रेसर असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राज्यात मविआचे सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला आहे. त्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चोख उत्तर दिले आहे. नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपद देण्याचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आश्वासन दिले असल्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी-वढेरा यांनी त्याबाबतची घोषणा करावी, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटते. शिवसेना शिंदे गटाने एकनाथ शिंदे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अजित पवार यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. अखेर मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील हे तीन प्रमुख नेते बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील.

- चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

राज्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून महायुतीचे निसटते सरकार सत्तेवर येणार आहे. दोन-चार जागांच्या फरकाने महायुती सरस ठरेल. येणाऱ्या २५ नोव्हेंबरला अजित पवार हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सत्तास्थापनेत अजित पवार हेच किंगमेकर ठरतील.

- अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) आमदार

मतदानाची टक्केवारी वाढते, त्यावेळी भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना त्याचा फायदा होत आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल. मात्र आमच्यात मुख्यमंत्रीपदाबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. निकाल आल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र बसून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आम्ही महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे गेलो. राज्यातील जनतेने एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांचा हक्क आहे. निकालानंतर तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी आम्हाला खात्री आहे.

- संजय शिरसाट, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते

महाराष्ट्रातील पुढील सरकार महाविकास आघाडीचे असेल, जनतेचा कल काँग्रेसकडे असून पक्षाचे बहुतांश उमेदवार विजयी होतील. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. मतदानाच्या ट्रेंडवरून राज्यात सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील.

- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, हे मी मानत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असेल, आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार, असे हायकमांडने सांगितले असेल तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी तसे जाहीर करायला हवे.

- संजय राऊत, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार

logo
marathi.freepressjournal.in