राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

Maharashtra assembly elections 2024 : विरार येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर कायदेशीर नोटीस बजावली असून काँग्रेसच्या नेत्यांनी माफी मागावी अथवा कारवाईला सामोरे जावे, असे तावडे यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची  नोटीस
Published on

नवी दिल्ली : विरार येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर कायदेशीर नोटीस बजावली असून काँग्रेसच्या नेत्यांनी माफी मागावी अथवा कारवाईला सामोरे जावे, असे तावडे यांनी म्हटले आहे.

विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता. या आरोपानंतर विरोधकांनी विनोद तावडे आणि भाजपवर सडकून टीका केली होती. विधानसभा निवडणूक मतदानाच्या काही तास आधीच हा प्रकार झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान, विनोद तावडे आणि भाजपच्या नेत्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. मात्र विनोद तावडे यांनी आता मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तावडे यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे.

गेली ४० वर्षे मी राजकारणात आहे, पण मी असे काम कधीच केले नाही. पण काँग्रेसच्या नेत्यांना माझी, पक्षाची आणि माझ्या नेत्यांची बदनामी करायची होती, म्हणून ते जाणीवपूर्वक मीडिया, ट्विटर आणि लोकांसमोर खोटे बोलले. त्यामुळे मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असेही ते म्हणाले.

विनोद तावडे यांची नेत्यांना नोटीस

काँग्रेस नेत्यांनी माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक अशी विधाने केल्याचे तावडे म्हणाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया यांनी विनोद तावडे हे ५ कोटी रुपये मतदारांना वाटताना रंगेहाथ सापडले अशी विधाने केली. त्यांना अशा प्रकारची विधाने करून मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करायचे होते, असे तावडे यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in