साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार 'करेक्ट कार्यक्रम' याकडे सर्वांच्या नजरा!

Maharashtra assembly elections 2024 : सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत विधानसभा आणि विधानपरिषद असे नऊ आमदार निवडणूक लढवत असून या सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीत कुणाच्या अंगांवर विजयाचा गुलाल पडणार आणि कुणा कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार 'करेक्ट कार्यक्रम' याकडे सर्वांच्या नजरा!
Published on

कराड : सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत विधानसभा आणि विधानपरिषद असे नऊ आमदार निवडणूक लढवत असून या सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीत कुणाच्या अंगांवर विजयाचा गुलाल पडणार आणि कुणा कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या सर्वच मतदारसंघांत एकूण १०९ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी येथे खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीतच होत आहे. तरीही पाटण आणि वाई विधानसभा मतदारसंघांत बंडखोरांनी चांगलीच रंगत आणली आहे. या दोन्ही मतदारसंघांत बंडखोरांनी चांगलेच रान तापवले आहे. त्यामुळे संबंधित बंडखोर राजकीय गणिते बदलून कोणाचा फायदा करणार का? की कोणाचा कार्यक्रम करत स्वत:च बाजी मारणार हे निकालानंतरच समोर येईल.

वाई विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील उभे असून त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरुणादेवी पिसाळ या कै. मदनराव पिसाळ यांच्या सून असून मकरंद पाटील यांच्यापुढे त्यांचे कडवे आव्हान आहे. त्यातच अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्यामुळेही विभागातील गणिते बदलण्याची शक्यता आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपकडून पुन्हा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवेंद्रराजे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेने अमित कदम यांना मैदानात उतरवले आहे. आधीच शिवेंद्रराजेंचा एकहाती दबदबा, त्यात उदयनराजेंची साथ आहे. तरीही कदम यांना महाविकास आघाडीची किती ताकद मिळणार हे पाहावे लागणार आहे. त्यावरच तेथील जय पराजयाची भिस्त अवलंबून आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन शिंदेंमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे शड्डू ठोकून तयार आहेत. कोरेगाव मतदारसंघात यंदाही काटे की टक्कर पाहायला मिळणार असल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. मागील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या महेश शिंदे यांनी पराभव केला. आता दोघेही पुन्हा समोरासमोर आले आहेत.

जिल्ह्यातील कायम दुष्काळी भागातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चौथ्या विजयासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे मैदानात उतरले आहेत. याठिकाणी घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे आता बंधू विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत गेले आहेत. शेखर गोरेंनी दोन दिवसांपासून बंधू जयकुमार गोरे यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. आता दोन्ही गोरे बंधू एकत्रित आल्याने घार्गे यांच्यासाठी ही निवडणूक जड जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणारा यावर निकाल अवलंबून असेल.

फलटण विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण चौकार ठोकण्याच्या तयारीत आहेत. दीपक चव्हाण हे फलटणचे विद्यमान आमदार असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हेच फलटणचे किंगमेकर राहिलेत हे वेगळं सांगायला नको. विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन कांबळे यांनी आव्हान उभे केले आहे. पण, या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच कस लागणार आहे. दोघेही दोन उमेदवारांच्या पाठीशी आहेत. दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. यामध्ये कोणाची प्रतिष्ठा उंचावणार व कोणाची धुळीस मिळणार हे येत्या २३ नोव्हेंबर रोजीच कळणार आहे.

साताऱ्यातील हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा कराड दक्षिण, उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघात होणार आहे. कारण या तिन्ही मतदारसंघांत माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री व विद्यमान मंत्रीगण अशी दिग्गज मंडळी आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते, विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. अतुल भोसले रिंगणात आहेत. डॉ. अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या मतदारसंघात तगडा मुकाबला होणार असल्याचे बोलले जाते.

पाटणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

हाय-व्होल्टेज ड्रामातील पाटण विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे विद्यमान मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे आता हॅटट्रिक मारणार की पराभूत होणार, याकडे केवळ जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी शिंदे आणि उबाठा या दोन सेना समोरासमोर उभ्या ठाकलेल्या आहेत. उद्धव सेनेकडून हर्षद कदम मैदानात आहेत. तरीही महाविकास आघाडीतील बंडखोर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पालकमंत्र्यांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. सत्यजित पाटणकर यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शंभूराज देसाई यांच्यासाठी सोप्पा असलेला पेपर आता अवघड बनला आहे.

कराड उत्तरमध्ये कमळ की तुतारी बाजी मारणार?

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद पवार गटाकडून राज्याचे माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना रंगणार आहे. बाळासाहेब पाटील आतापर्यंत पाच वेळा कराड उत्तरचे आमदार राहिलेत, तर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते सहकार मंत्री म्हणून काम करत होते. मात्र, यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी सोप्पी नक्कीच राहिलेली नाही. त्यामुळे उत्तरेत यंदा कमळ फुलणार की तुतारीतला आवाज घुमणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in