मुंबई : शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या काही जणांनी बंडाची योजना आखून स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामध्ये दोन विद्यमान मंत्रीही आहेत, मात्र स्वगृही परतण्याचा विचार तुम्ही सोडून द्या, असे आम्ही त्यांना स्पष्टपणे बजावले, असे शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
या विधानसभा निवडणूक काळात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिंदे गटात गेलेल्या काही लोकांनी शिवसेनेत (ठाकरे) परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आम्ही त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना ओळखण्यात शिवसेना आणि वरिष्ठांची चूक झाली तशीच चूक शिंदे गटात गेलेल्या ४० जणांबद्दलही झाली, असेही आदित्य म्हणाले.
आदित्य ठाकरे मुलाखतीत पुढे म्हणाले की, गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आठ जणांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. या आठ जणांमध्ये दोन वरिष्ठ मंत्रीही होते, त्यांना परत यायचे होते, त्यांना आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवायची होती. ते आम्हाला म्हणाले, तुम्ही साहेबांना (उद्धव ठाकरे) विचारा, आम्ही इथे बंडाची घोषणा करतो, मोठे बंड करू, मग माफी मागू आणि त्यानंतर पक्षात परत येऊ, अशी त्यांनी योजना बनवली होती. मात्र, आम्ही त्यांना नकार कळवला.