शिरीष पवार / मुंबई
वर्ष २००९ मध्ये काँग्रेसला 'कृपा'प्रसाद दिल्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये मूळच्या शिवसेनेला थोडक्या मतांच्या फरकाने पावलेल्या कलिना विधानसभा मतदारसंघात यावेळी ठाकरे सेनेचे विद्यमान आमदार संजय पोतनीस आणि भाजपकडून दुसऱ्यांदा मैदानात उतरलेले अमरजीत अवधनारायण सिंह आमने-सामने आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाळकृष्ण शिवाजी हुटगी यांना उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय बसपाच्या सुशीला गांगुर्डे, वंचित बहुजन आघाडीचे मो. लुकमन सिद्दीकी तसेच अन्य पक्ष, अपक्ष मिळून १६ उमेदवार रिंगणात आहेत.
रस्ते, पदपथांची दुरवस्था, रुग्णालय सुविधांचा अभाव, झोपडपट्ट्या, पाणीटंचाई, मोकळी मैदाने - उद्यानांचा अभाव, अस्वच्छता, पुनर्विकास - पुनर्वसन प्रकल्पांचे भिजत घोंगडे अशा नाना प्रकारच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसचे कृपाशंकर सिंह हे ५१ हजार २०५ मते मिळवून निवडून आले होते. तेच कृपाशंकर सिंह २०१४ मध्ये येथे काँग्रेसकडून लढताना तिसऱ्या क्रमांकावर (२३ हजार ५९५ मते) फेकले गेले. त्यावेळी शिवसेनेचे संजय पोतनीस अवघ्या १२९७ मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यांना ३० हजार ७१५, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे अमरजीत सिंह यांना २९ हजार ४१८ मते मिळाली होती. त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेले कप्तान मलिक यांनी १८ हजार हजार १४४ मते घेतली होती. २०१९ मध्ये मात्र शिवसेना - भाजप एकत्रितपणे लढले. त्यावेळी शिवसेनेचे संजय पोतनीस (४३,३१९) यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे जॉर्ज अब्राहम (३८,३८८) यांच्यावर ४९३१ मतांनी मात केली. तेव्हा मनसेचे संजय तरडे यांना तिसऱ्या क्रमांकाची २२ हजार ४०५ मते मिळाली होती. पुढे शिवसेनेत उभी फूट पडली. पोतनीस यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली. यावेळी पुन्हा ठाकरे पक्षाची उमेदवारी पोतनीस यांना मिळाली आहे. ठाकरे सेनेच्या उमेदवारासाठी येथे महाविकास आघाडीतील आदी घटक पक्ष कितपत काम करतात, हे निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. या मतदारसंघात अनुसूचित जातीचे मतदार साडेपाच टक्के, मुस्लिम मतदार २४ टक्के, ख्रिस्ती मतदार सात टक्के आहेत. सुमारे १६ टक्के उत्तर भारतीय मतदार असून मराठी मतदारांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कलिना क्षेत्रामधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना १६ हजार २९२ इतके मताधिक्य मिळाले होते.
इमारतीच्या उंचीवर असलेल्या निर्बंधामुळे येथील अनेक जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यांच्यासाठी ठोस धोरण ठरविण्याबरोबरच विमानतळ हद्दीतील झोपड्यांचे स्थानांतर आणि पुनर्वसन यावर पोतनीस यांनी भर दिला आहे. तर, महायुतीचे सिंह यांनी वाहतूक, पाणीपुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन, इमारतींचा पुनर्विकास, पालिकेची रुग्णालय सेवा आदी मुद्दे प्रचारात आणले आहेत.
मतदारसंघातील समस्या
वाहतूक कोंडी
पाणीटंचाई
विमानतळाच्या जागेवरील झोपड्यांचे पुनर्वसन
रखडलेले एसआरए प्रकल्प
फनेल झोनमध्ये रखडलेला जुन्या इमारतींचा पुनर्विकास
खराब रस्ते, पदपथ
मतदार
पुरुष - १,२९,१५६
महिला - १,१२,५६६
तृतीयपंथी - १२
एकूण - २,४१,७३४