मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी पार पडल्यानंतर राज्यात कुणाचे सरकार येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच, ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये सत्तेच्या सिंहासनासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काँटे की टक्कर असल्याचे समोर आले आहे. बहुमताचा जादुई १४५चा आकडा पार करण्यासाठी युती आणि आघाडीमध्ये जोरदार चुरस रंगणार आहे. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन होणार की पुन्हा ट्रिपल इंजिन महायुतीचे सरकार येणार, याचा फैसला आता शनिवारीच होणार आहे.
बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतर मतदान पूर्ण झाल्यावर विविध एजन्सीचे एक्झिट पोल जनतेसमोर आले आहेत. त्यात काहींनी महायुतीला तर काही एजन्सींनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. मात्र हा कौल देताना, युती किंवा आघाडी यांच्या विजयी आमदारांच्या संख्येत फारशी तफावत नसल्याचे दिसत आहे. मतदानानंतर जवळपास १० ते १२ एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असून त्यापैकी बहुतेकांनी महायुतीचे सरकार सत्तेवर येणार, असा कौल दिला आहे. यामध्ये मॅट्रिक्स, पोल डायरी, चाणक्य, पी-एमएआरक्यू या एक्झिट पोल्सने महायुतीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. फक्त मोजक्याच एक्झिट पोलनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मत दिले आहे.
चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला १५२ तो १६० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून भाजपला ९०, शिवसेना शिंदे गट ४८, राष्ट्रवादी अजित पवार गट २२ जागा मिळतील, असा अंदाज आहे. भाजप सलग तिसऱ्यांदा राज्यात विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा मिळतील, असे चाणक्यचे म्हणणे आहे. काँग्रेस ६३, शिवसेना ठाकरे गट ३५ तर राष्ट्रवादी शरद पवार गट ४० जागांवर मजल मारेल, असे त्यात म्हटले आहे.
अपक्ष ठरणार किंगमेकर
विविध पक्षांचा मतविभाजनाचा फटका अनेक प्रमुख उमेदवारांना बसणार असला तरी राज्यात विजयी अपक्ष उमेदवार किंगमेकर ठरू शकतात, असे एक्झिट पोलच्या अंदाजावरून दिसत आहे. अपक्षांना १८ ते २० जागा मिळतील, असा अंदाज बहुतांशी एक्झिट पोलने दिला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेत अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष
गेल्या निवडणुकीत १०५ जागा जिंकणारा भाजप हाच पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला जास्तीत जास्त ८० ते ९० जागा मिळू शकतात. याचाच अर्थ, भाजपच्या जागाही घटणार आहेत. दुसरीकडे काँग्रेस ५८ ते ६० जागांवर विजयी होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ४० ते ४५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच शिवसेना शिंदे गट ३० ते ३५ तर शिवसेना ठाकरे गट ३५ ते ४० जागांवर मजल मारेल, असा अंदाज आहे. अजित पवार गटाला मात्र सर्वाधिक कमी म्हणजेच १५ ते २० जागा मिळण्याचा अंदाज बहुतांशी एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे.
एक्झिट पोलचे अंदाज
जागा २८८ (बहुमत १४५)
सर्व्हे एजन्सी महायुती मविआ इतर
न्यूज-१८ मॅट्रिज १५०-१७० ११०-१३० ८-१०
पी मार्क १३७-१५७ १२६-१४६ २-८
न्यूज-२४ चाणक्य १५२-१६० १३०-१३८ ६-८
पीपल्स पल्स १८२ ९७ ९
इलेक्टोरल एज ११८ १५० २०
पोल डायरी १२२-१८६ ६९-१२१ १२-२९
आयएएनएस-मॅट्रिज १४५-१६५ १०६-१२६ —
लोकपोल ११५-१२८ १५१-१६२ ५-१४
टीव्ही ९ १२९-१३९ १३६-१४५ १३-२३
दिव्य मराठी १२५-१४० १३५-१५० २०-२५