मतविभाजन टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Maharashtra assembly elections 2024 : मध्य विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत मतविभाजन हा कळीचा मुद्दा ठरतो आहे. या मतदारसंघात शिवसेना, एमआयएम, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, मनसे यांच्यासह अनेक पक्षांचे २४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे लढत बहुरंगी होत असून मतविभाजनामुळे अंतिम निकालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मतविभाजन टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Published on

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर

मध्य विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत मतविभाजन हा कळीचा मुद्दा ठरतो आहे. या मतदारसंघात शिवसेना, एमआयएम, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, मनसे यांच्यासह अनेक पक्षांचे २४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे लढत बहुरंगी होत असून मतविभाजनामुळे अंतिम निकालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

जुन्या शहराचा मोठा भाग असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात अटीतटीची लढत पहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुरवातीला किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत तनवाणी यांनी माघार घेतली. त्यामुळे पक्षाने बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे, शिवसेनेने विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यावर विश्वास टाकला आहे.

एमआयएमकडून नासेर सिद्दीकी, वंचित बहुजन आघाडीचे जावेद कुरेशी, मनसेचे सुहास दाशरथे, आणि बसपाकडून विष्णू वाघमारे यांच्यासह अनेक महत्त्वाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

प्रचारासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा पार पडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, असदुद्दीन ओवेसी, प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी मतदारांशी संवाद साधला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे.

सर्व पक्ष आपआपल्या हक्काच्या मतपेढीचे विभाजन टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, यंदा मतविभाजन कोणाच्या बाजूने होईल आणि कोणाला त्याचा फायदा मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही बहुरंगी लढत आगामी निकालांसाठी निर्णायक ठरणार आहे.

चार माजी नगरसेवक रिंगणात

या मतदारसंघात चार माजी नगरसेवक लढत देत आहेत. बाळासाहेब थोरात (उद्धव गट), जावेद कुरेशी (वंचित आघाडी), नासेर सिद्दीकी (एमआयएम), आणि बंडू ओक (अपक्ष) यांच्यात चुरस पहायला मिळते. २०१४च्या निवडणुकीत प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांच्यात झालेल्या मतविभाजनाचा फायदा इतर पक्षांना झाला होता. मात्र, यंदा या दोघांनी एकत्र येत सख्य केल्यामुळे परिस्थितीत बदल झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील समीकरणे नव्याने जुळली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in