...तर बंडखोरांवर कठोर कारवाई: उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा इशारा
मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणुकीत महाविकास आघाडी एकजुटीने लढणार आहे. तरीही पक्षाचा आदेश डावलून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असेल, तर त्या बंडखोरावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. पक्षांतर्गत बंडाळी केलेल्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. पक्षात योग्य तो मानसन्मान मिळेल, पण उमेदवारी अर्ज मागे घ्या, असे आवाहन करूनही दुर्लक्ष करणाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा ‘मविआ’च्या नेत्यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेता महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी जागावाटपात वेळकाढूपणा केला. मात्र २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आणि महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र, पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने नाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे विविध राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली. मात्र, सोमवारपर्यंत अनेक बंडखोरांचे मन वळवण्यात पक्षनेत्यांना यश आले आणि बहुतांश अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र, तरीही काहींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी घेतला आहे.
शिवसेना ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आदी नेत्यांनी सोमवारी दुपारी ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी पवारांची भेट घेत याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपल्या स्तरावर प्रयत्न केले आहेत. तसेच महाविकास आघाडीकडून मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली असून उरणची जागा ठरल्याप्रमाणे शिवसेना लढणार असून उर्वरित अलिबाग, पेण आणि पनवेलची जागा जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाला दिल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले, तर बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही प्रयत्न केल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
मविआच्या मित्रपक्षांशी चर्चा - संजय राऊत
विधानसभा निवडणूक एकत्रित लढवावी अशीच महाविकास आघाडीची भूमिका आहे. मात्र काही ठिकाणी समाजवादी, कम्युनिस्ट किंवा शेतकरी कामगार पक्षाकडून अर्ज भरण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी संबंधितांशी चर्चा केल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.