शिवसेना ठाकरे गटाला मिळाली सुधारित 'मशाल'! विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षचिन्हात 'हा' बदल

लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या चिन्हावरून विरोधकांनी खिल्ली उडविली होती. 'मशाल' हे चिन्ह आईस्क्रिमच्या कोनासारखे दिसते, असे विरोधकांनी म्हटले होते.
शिवसेना ठाकरे गटाला मिळाली सुधारित 'मशाल'! विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षचिन्हात 'हा' बदल
ट्विटरवरुन घेतलेला स्क्रीनशॉट
Published on

मुंबई : बंडखोरीनंतर 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' हे पक्षचिन्ह देण्यात आले होते. याच चिन्हावर लोकसभेची निवडणूकही लढवण्यात आली. मात्र, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या चिन्हामध्ये उद्धव ठाकरे यांनी काही बदल करण्याची मागणी केली होती. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी हे नवे सुधारित चिन्ह ठाकरे गटाला देण्यात आले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 'मशाल' हे चिन्हच कायम असणार आहे, मात्र मशाल हातात धरण्याचा जो आकार होता तो आईस्क्रिमच्या कोनासारखा वाटत असल्यामुळे तो बदलून आता वरती पेटत्या ज्वाळा आणि खाली बॅटरीसारखा आकार देण्यात आला आहे. तसेच आतील भगवा रंग काढण्यात आला आहे.

विरोधकांच्या खिल्लीनंतर बदल

लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या चिन्हावरून विरोधकांनी खिल्ली उडविली होती. 'मशाल' हे चिन्ह आईस्क्रिमच्या कोनासारखे दिसते, असे विरोधकांनी म्हटले होते. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. नव्या सुधारित चिन्हामध्ये 'टॉर्च' स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवरही टॉर्चसारखेच दिसणारे नवे निवडणूक चिन्ह दिसणार आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना ईव्हीएमवर सुधारित 'मशाल' हे चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून दिसणार आहे.

पेटत्या मशालीचा आणि शिवसेनेचा खूप आधीपासूनचा संबंध आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८५ मध्ये 'ज्वलंत मशाल' हे निवडणूक चिन्ह वापरून निवडणूक यशस्वीपणे लढवली होती. शिवसेनेने स्थापनेपासून अनेक चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. त्यात रेल्वे इंजिन, ताडाच्या झाडांची जोडी, तलवार आणि ढाल यांचा समावेश आहे. तर १९८९ मध्ये शिवसेनेने 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत चार खासदार लोकसभेवर पाठवले होते. शिंदे गटाला शिवसेनेचे 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्ह देताना आयोगाने ठाकरे गटाला पर्याय विचारले होते. तेव्हा ठाकरे गटाने 'पेटत्या मशाली'चा पर्याय आयोगाला दिला होता. याच चिन्हावर ठाकरेंनी लोकसभा लढविली होती. आता थोडासा बदल करण्यात आला असला तरी नवे चिन्ह ठाकरेंच्या उमेदवारांच्या प्रचारात आणि बॅनरवर दिसू लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in