तावडे पैसेवाटपाच्या चक्रव्यूहात; विरारमध्ये पैसे वाटत असल्याचा ‘बविआ’चा आरोप भाजपने फेटाळला

Maharashtra assembly elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला विरार पूर्वेकडील ‘हॉटेल विवांता’मध्ये भाजप आणि बविआमध्ये पैसे वाटण्यावरून वादावादी झाली. विनोद तावडे व त्यांचे सहकारी पैसे वाटप करीत असल्याचा आरोप बविआने केला.
तावडे पैसेवाटपाच्या चक्रव्यूहात; विरारमध्ये पैसे वाटत असल्याचा ‘बविआ’चा आरोप भाजपने फेटाळला
Published on

वसई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला विरार पूर्वेकडील ‘हॉटेल विवांता’मध्ये भाजप आणि बविआमध्ये पैसे वाटण्यावरून वादावादी झाली. विनोद तावडे व त्यांचे सहकारी पैसे वाटप करीत असल्याचा आरोप बविआने केला. भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपांमुळे दिवसभर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपमधील अंतर्गत राजकारणात तावडे यांचा ‘गेम’ झाल्याचीही चर्चा दिवसभर रंगली होती.बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडेंवर थेट पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला. एवढेच नव्हे, तर विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे असताना तिथे पैसे व वाटपासंदर्भातील तपशील असणारी डायरीही सापडल्याचा दावा क्षितीज ठाकूर यांनी केला. यावेळी क्षितिज ठाकूर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घालून प्रचंड गोंधळ घातला.

‘बविआ’ने केलेल्या तक्रारीनंतर विनोद तावडे आणि भाजपचे विरार-नालासोपारा विधानसभेचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पैसे वाटण्याच्या आरोपाचा तावडे यांनी इन्कार केला असून, याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. या हॉटेलच्या एका रूममधून साडेनऊ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. ती रक्कम तेथे कुणी आणली, याबाबत चौकशी सुरू आहे.

विवांता हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी उपस्थित असलेल्या विनोद तावडे, राजन नाईक व अन्य भाजप कार्यकर्त्यांना अचानक आलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरले आणि त्यांच्यावर पैसे वाटप करीत असल्याचा आरोप केला. त्यापाठोपाठ आमदार क्षितीज ठाकूर आणि नंतर आमदार हितेंद्र ठाकूर हॉटेलमध्ये आले. बविआच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. यावेळी बविआच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजपविरोधात आरोप केले. आपण भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आलो असल्याचे तावडे यांनी यावेळी त्यांना आणि माध्यमांना सांगितले.

तावडे व हितेंद्र ठाकूरांनी घेतली संयुक्त पत्रकार परिषद

प्रचंड गोंधळाच्या स्थितीत आमदार हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी उपस्थित पत्रकारांसमोर संयुक्त पत्रकार परिषद घेत, कार्यकर्त्यांना शांत केले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आमदार ठाकूर, तावडे आणि आमदार क्षितीज ठाकूर हे तिघे आमदार ठाकूर यांच्याच गाडीतून एकत्रितपणे घटनास्थळाहून बाहेर पडले. याप्रकरणी विनोद तावडे यांनी आपण पैसे वाटण्यासाठी नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आलो होतो. आपल्या गाडीची व आपल्या रूमची अधिकाऱ्यांनी तपासणी केली असून, त्यात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचे पत्रकारांना सांगितले, तर घटनास्थळी लाखो रुपये आढळून आले असून, हे पैसे मतदारांना वाटण्यासाठीच आणले होते, असा आरोप आमदार ठाकूर पिता-पुत्रांनी केला. बविआ कार्यकर्त्यांनी घेराव घातल्यानंतर तावडे यांनी मला २५ फोन केल्याचे व हा विषय संपवा म्हणून विनवल्याचे आ. ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.

काही पैसे, डायरी सापडली; पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती

“साधारण १२.३० सुमाराला आम्हाला समजले की भाजपचे काही कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये आले आहेत. त्या ठिकाणी राडा सुरू झाल्याचेही समजले. ज्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. साधारण सात ते आठ मिनिटांत आणखी पोलीस आले. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर भाजप आणि बविआचे लोक होते. आम्ही हॉटेल्सच्या रूम पाहिल्या तेव्हा आम्हाला काही पैसे आणि डायरी सापडल्या आहेत. या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात आम्ही दोन गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली

भ्रष्ट युतीचा कारभार उघडा पडला - पटोले

अखेर भ्रष्ट युतीचा कारभार उघडा पडला. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. संविधान आणि लोकशाहीचा अपमान भाजप वेळोवेळी करत आली आहे. आता बस्स झाले, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

एका रूममध्ये सापडली साडेनऊ लाखांची रोकड

याप्रकरणी विनोद तावडे व उमेदवार राजन नाईक यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले. तसेच विवांता हॉटेलच्या एका रूममधून साडेनऊ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, ती नेमकी कुणी आणली, याचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक अधिकारी आणि पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला असून, विरार, नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे कामे न झाल्यामुळे परिवर्तनाचा नारा देण्यात येत आहे. मग येथे भाजपवर अशी पैसे वाटण्याची वेळ का यावी? असा सवाल ठाकूर पिता-पुत्रांनी उपस्थित केला आहे.

मोदीजी ५ कोटी कुठून बाहेर आले - राहुल गांधी

मोदीजी, हे ५ कोटी रुपये कोणाच्या सेफमधून बाहेर आले? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला टेम्पोमधून कोणी पाठवला? असा थेट सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

महायुतीचा ‘नोट जिहाद’ - उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे आता पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. हा महायुतीचा ‘नोट जिहाद’ आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी केली. तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अन्यथा राज्यातील जनता कारवाई करेल. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा हा ‘नोट जिहाद' आहे. तसेच तावडे पैसे घेऊन गेले की त्यांना अडकवले? की हे भाजपमधील ‘गँगवॉर’ आहे, असा हल्लाबोलही ठाकरे यांनी केला.

तावडेंना तत्काळ अटक करा - चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ला मतदार पसंती देतील आणि आपला पराभव निश्चित आहे, याची भीती भाजपसह महायुतीला सतावत आहे. त्यामुळे पराभवाच्या भीतीने मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात येत असून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई-विरारमध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे तावडे यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

नोटबंदी केली तर पैसे कुठून आले - सुप्रिया सुळे

भ्रष्टाचार संपवण्यासाठी भाजप सरकारने नोटबंदी केली. मग तरीही एवढ्या नोटा कुठून आल्या. हा पैसा नेमका कोणाचा आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. विनोद तावडेंवर हा आरोप होत आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. भाजपच्या मूळ लोकांकडून अशी कामे होतील, असे मला वाटत नव्हते.

ही तर शरमेची बाब - दमानिया

तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी ‘लीक’ केली असल्यास ही शरमेची बाब आहे. अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? जे खुर्चीसाठी एकमेकांचा गळा कापायला निघाले, ते महाराष्ट्राच्या लोकांचे काय भले करणार. पैसे वाटणे, मते विकत घेणे आणि आता हे? आणि काय काय पाहावे लागणार आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.

तावडे, ठाकूरांसह चार जणांवर गुन्हा दाखल

राजन नाईक, विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम २२३ आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या १२६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तावडेंनी प्रकरण मिटवण्यासाठी केले २५ फोन - हितेंद्र ठाकूर

डीसीपी मॅडम म्हणाल्या की, पत्रकार परिषद थांबवा. आम्ही थांबवली. माझ्यावर कुठलाही दबाव वगैरे काहीही नाही. मला त्यांनी २५ फोन केले, आता सुरू आहे ते मिटवा, आपण मित्र आहोत. जाऊ द्या, विनोद तावडेंना सोडून दिले. एका खोलीत १० लाख, कुठे दोन लाख, कुठे पाच लाख असे पैसे मिळाले आहेत. कुठे किती पैसे मिळाले ते पोलिसांना विचारा, असे हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

तावडे, नाईक यांच्यावर हल्ला झाला - फडणवीस

विनोद तावडे हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. राजन नाईक हे आमचे उमेदवार आहेत. या दोघांवरही हल्ला झाला आहे. तावडे यांच्याकडे कुठलेही पैसे नव्हते आणि त्यांनी कोणतेही पैसे वाटलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया रात्री उशिरा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तावडे हे केवळ कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी कट करून त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. राजन नाईक यांनाही मारहाण झालेली आहे. हे विरोधकांचे षडयंत्र असून, पराभवाच्या भीतीने हे लोक बहाणेबाजी करत आहेत. तावडे यांचा या प्रकरणात कोणताही दोष नाही, असे फडणवीस म्हणाले.

तावडेंना बदनाम करण्याचे षडयंत्र - बावनकुळे

भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा बिनबुडाचा आरोप करण्यात येत असून, पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच षडयंत्र करून तावडे यांना बदनाम करण्यात येत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in