मुंबई : मतदान केंद्रांवर तोडफोड करणे, प्रतिस्पर्धी गटातील कार्यकर्त्याला एकटे गाठून मारहाण आणि शिवीगाळ करणे, आपल्या नादी कोण लागला तर त्याला आपण सोडत नाही, अशी धमकीची भाषा वापरणे, मस्ती आली का तुला, एका मिनिटात नीट करून टाकेन, प्रतिस्पर्धी गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन दमदाटी करणे आणि त्यावर कळस म्हणजे एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या अंगावर धावून जात, ‘आज तुझा मर्डर फिक्स’ आहे, अशी पोलिसांसमोरच जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार बिहारमध्ये नव्हे तर सुसंस्कृत महाराष्ट्रात बुधवारी विधानसभेच्या मतदानादरम्यान घडले. त्यावरून या सुसंस्कृत राज्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे याची कल्पना केली तरी मान शरमेने खाली जात आहे.
शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ दानवे यांनी त्यांच्या ‘एक्स’ या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये संजय शिरसाट हे एका पदाधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. अंबादास दानवे यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत संजय शिरसाट हे एका पदाधिकाऱ्याला, ‘नीट करुन टाकेन, एका मिनिटात, मस्ती आली का तुला जास्त’, अशी धमकी देत असल्याचे दिसत आहे.
शिरसाटांचे म्हणणे
‘जशास तसे उत्तर द्यावे लागते ना, मी ते उत्तर दिले आहे. मी एक तर कधी कुणाच्या नादी लागत नाही. नादी लागलो तर त्याला सोडतही नाही. या प्रकाराची पोलीस तक्रार करण्याची आवश्यकता नाही. या छोट्या तक्रारी करण्यासाठी वेळ कुणाकडे आहे? छोटा विषय लगेचच त्याच ठिकाणी दाबला पाहिजे. अन्यथा छोटा विषय मोठा होतो आणि त्यानंतर मतदारांना त्रास होतो. त्यामुळे काही वेळा अशा प्रकारची लोकशाही लोकांना आवडते. विरोधकांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे ते गडबड करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे’, असे संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
भुजबळ काय म्हणाले?
आपण एका रस्त्यावरून जात असताना काही बसगाड्या, टेम्पो, ट्रक उभे असलेले दिसले. त्यामागे कांदे यांची शाळा आहे. या शाळेत कांदे यांनी हजारो लोकांना डांबून ठेवले होते. त्यांना पैसे आणि जेवण दिले जात होते याची माहिती आपण निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. तेवढ्यात कांदे तेथे आले आणि आपल्या अंगावर धावून आले. तडीपार गुंड मनमाडमध्ये, नाशिकमध्ये शस्त्र घेऊन फिरत आहेत. लोकांना धमक्या देत आहेत. आज ते पोलिसांसमोरच आले होते. मी पोलिसांना म्हटले की यांना अटक करा. परंतु, त्यांनी अटक केली नाही. पोलिसांनी त्यांना इथून पळून जायला सांगितले. पोलीसच गुन्हेगारांना पळवून लावत होते. आमदाराच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ केली, मला मारायची धमकी दिली आणि पोलीस मात्र हे सगळे बघत बसले होते. माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. शिवीगाळ होत आहे. आज पत्रकारांसमोर मला शिवीगाळ केली. मला मारण्याची धमकी दिली. ‘आज तुझा मर्डर होणार’, ‘तुझा मर्डर फिक्स आहे’, असे शब्द आमदाराने वापरले. मी तुझा मर्डर करणार असे बोलून ते मला धमक्या देत होते. पोलीस मात्र निमूटपणे बघत होते, असेही भुजबळ म्हणाले.
शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण
वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे पदाधिकारी नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नितेश कराळे यांना मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यानंतर नितेश कराळे यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच नेमके काय घडले, याबाबत सविस्तर घटनाक्रमही त्यांनी सांगितला.
कराळे काय म्हणाले?
गावावरून मतदान करून येत होतो. तेव्हा वर्धा मतदारसंघात मी निघालो होतो, यावेळी माझ्याबरोबर माझे कुटुंबही होते. उमरी या गावात जाण्यायेण्याचा रस्ता आहे. त्या ठिकाणी मी थांबलो लोकांना विचारपूस केली. तेव्हा उमरीमधील भाजपचा एक कार्यकर्ता माझ्या अंगावर धावून आला. तो कार्यकर्ता थेट माझ्या अंगावर धावून आला आणि मारहाण करू लागला. माझ्या पत्नीलाही शिवीगाळ केली. यामध्ये माझ्या लहान मुलीलाही लागले, असा आरोप नितेश कराळे यांनी केला.
अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होत असल्याने हा मतदारसंघ अतिशय संवेदनशील बनला आहे. त्यामुळे येथील मतदारसंघातील बुथवर दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. त्यातच, युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर दमदाटीचे आरोप केले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीप वाटण्यात येत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आम्ही याची तक्रार करणार असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले. त्यावर, आता अजित पवारांनी हे सर्व आरोप फेटाळले असून निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस यंत्रणा याबाबत पाहून घेतील, असे म्हटले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
‘शर्मिला पवार यांचा तो आरोप धादांत खोटा आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व काही आले असेल, तसे काही असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहतील. आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाही धमक्या दिल्या नाहीत. माझा कार्यकर्ता असे कधीही करणार नाही, माझा माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. तसेच, काही गैरप्रकार वाटत असल्यास पोलीस तक्रारीची चौकशी करतील,' असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
आज तुझा मर्डर फिक्स! समीर भुजबळांना धमकी
नांदगाव मतदारसंघात धमकी प्रकरणाने कळसच गाठला. शिवसेना (शिंदे) उमेदवार सुहास कांदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार समीर भुजबळ यांच्या अंगावर धावून जात भुजबळांना 'आज तुझा मर्डर फिक्स' अशी धमकी दिल्याने खळबळ माजली आहे. कांदे यांनी बाहेरील लोकांना आणल्याचा आरोप केला जात आहे आणि त्यावरून कांदे आणि भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. कांदे यांच्या गुरुकुल या शैक्षणिक संस्थेबाहेर पोलिसांच्या समोरच कांदे आणि भुजबळ एकमेकांना भिडल्याचे पाहावयास मिळाले.
खासदार सोनावणे संतप्त
दरम्यान, शरद पवारांच्या पक्षाचे खासदार, बीडचे लोकप्रतिनिधी बजरंग सोनावणे यांनीदेखील या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. यासह सोनावणे यांनी म्हटले आहे की आमचे सहकारी ॲड.माधव जाधव यांना परळी मतदारसंघातील बुथबाहेर विरोधी पक्षाच्या गुंडानी बेदम मारहाण केली. अशा दहशत पसरवणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध करतो. परळी मतदारसंघात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत छेडछाड केलेले अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. परळीत मतदान केंद्राची तोडफोड व ईव्हीएम यंत्रही फोडण्यात आले.