नवी मुंबई : माजी मंत्री व विद्यमान भाजप आमदार गणेश नाईक आणि त्यांचे सुपुत्र माजी आमदार तथा भाजपचे विद्यमान नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आमदारकीच्या तिकिटासाठी दबावतंत्र सुरू केले आहे.
भाजपकडून आ. गणेश नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून, तर बेलापूरमधून विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांना तिकीट निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बेलापूरमधून निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेल्या संदीप नाईक यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने नवी मुंबईतून विधानसभेची दोन तिकिटे द्यावी, अन्यथा आम्ही वेगळा पर्याय निवडू, असा दबाव गणेश नाईक आणि त्यांच्या समर्थकांकडून आणला जात आहे.
वास्तविक पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या गणेश नाईक यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकारच्या काळात मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी घरोबा केला होता. यानंतर गणेश नाईक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्येही मंत्री राहिले. त्यामुळे नाईक यांची नवी मुंबईतील राजकारणात एकहाती सत्ता राहिलेली आहे. त्यानंतर त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीवेळी गणेश नाईकांकडून माजी खासदार संजीव नाईक यांना ठाण्यातून उमेदवारी देण्याची मागणीही करण्यात आली होती. पण, नाईकांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याचा चंग नाईक परिवाराने बांधला आहे. संदीप नाईक यांनी तर गेल्या वर्षभरापासून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मतदारसंघातच शिरकाव करून पद्धतशीरपणे काम सुरू केले आहे. यादरम्यान नाईक आणि मंदाताई म्हात्रे यांच्यात शाब्दिक युद्धदेखील दिसून आले.
स्वगृही परतण्याची शक्यता
दुसरीकडे जर पक्षबदल करावयाचा झाल्यास गणेश नाईक यांना राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) असे दोन पर्याय असल्याचे त्यांचे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. म्हणजेच नाईक यांनी स्वगृही परतावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे नाईक पिता-पुत्र स्वगृही परततात की अपक्ष म्हणून लढतात? याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. पण, तूर्तास नाईक यांनी आता दबावतंत्र सुरू केले की चाचपणी सुरू केली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.