पाऊले चालती 'मातोश्री'ची वाट ! कोकण, सिल्लोड, सांगोल्यात भाजपला झटका; पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनाही धक्का

विधानसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाची 'मशाल' हाती घेण्यासाठी महायुतीतील अनेक नाराज नेते 'मातोश्री' वर दाखल होऊ लागल्याने ठाकरे सेनेला नवे बळ प्राप्त झाले आहे.
सिल्लोडचे भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले.
सिल्लोडचे भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले.
Published on

मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाची 'मशाल' हाती घेण्यासाठी महायुतीतील अनेक नाराज नेते 'मातोश्री' वर दाखल होऊ लागल्याने ठाकरे सेनेला नवे बळ प्राप्त झाले आहे. सांगोल्याचे भाजप नेते दीपक साळुंखे, कोकणातील भाजपचे नेते राजन तेली, सिल्लोडचे भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. तर, अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सांगोल्यात आमदाराने गद्दारी केली, पण तेथील जनता शिवसेनेसोबत आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णालय वारी झाली, तेव्हा डॉक्टर म्हणाले, काही दिवस आराम करा, पण म्हटलं आधी हराम्यांना हटवायचंय, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, विनायक राऊत, अनिल कोकीळ आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथी सुरू झाल्या आहेत. कोकणात भाजपचे नेते नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यातील भाजपचे नेते राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. राजन तेली यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. 'सांगोल्यात आमदार निवडून आणला आणि त्या आमदाराने गद्दारी केली. सध्या ते घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मात्र, आजही सांगोल्यातील जनता शिवसेनेसोबत आहे. दीपक साळुंखे सांगोल्याचे पुढील आमदार आहेत'. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी दीपक साळुंखे यांची उमेदवारी यावेळी जाहीर केली.

सिल्लोड येथील भाजपचे सरचिटणीस सुरेश बनकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. बनकर यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश म्हणजे सिल्लोडमधील कलंक जाळण्यासाठी बनकर यांनी हातात 'मशाल' घेतली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आबा म्हणजे कार्यक्रम फिक्स

सांगोल्यात भाजप नेते दीपक साळुंखे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 'आबा म्हणजे समोरच्याचा कार्यक्रम फिक्स', असा टोलाही संजय राऊत यांनी शहाजी बापू राजाराम पाटील यांना लगावला.

गद्दारांच्या छाताडावर बसून विजयी होणार - राऊत

'काय ती झाडी, काय तो डोंगर' म्हणणाऱ्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बनवले. मात्र ते गद्दार झाले. त्यामुळे या गद्दारांच्या छाताडावर बसून 'मशाल' विजयी होणार, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेत 'इन कमिंग' जोरात सुरू असून उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ होत आहे. शिवसेना हा पक्ष नसून तो एक परिवार आहे, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनाही धक्का

अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

logo
marathi.freepressjournal.in