ठाकरेंचे वलय संपले का?

Maharashtra Assembly Elections Results 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वांसाठीच धक्कादायक ठरले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या अनपेक्षित यशानंतर एवढ्या कमी कालावधीत महायुती ‘कमबॅक’ करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. बरं महायुतीचे ‘कमबॅक’ही इतके दणदणीत आहे की, महाविकास आघाडीचा पार सुपडासाफ झाला आहे.
ठाकरेंचे वलय संपले का?
Published on

राजेंद्र पाथरे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वांसाठीच धक्कादायक ठरले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या अनपेक्षित यशानंतर एवढ्या कमी कालावधीत महायुती ‘कमबॅक’ करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. बरं महायुतीचे ‘कमबॅक’ही इतके दणदणीत आहे की, महाविकास आघाडीचा पार सुपडासाफ झाला आहे. १५०च्यावर जागांची अपेक्षा असलेल्या महाविकास आघाडीला महायुतीने अवघ्या पन्नास जागांवर गुंडाळल्याने महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गटाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळू शकली नाही, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या २० जागा मिळाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रात ठाकरेंच्या नावाला असलेले वलय संपुष्टात आले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेना म्हटले की ‘ठाकरे’ हे गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून असलेले समीकरण आता संपुष्टात येणार की काय, अशी स्थिती विधानसभेच्या निकालामुळे निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत १९९० मध्ये लहान भाऊ म्हणून ४२ जागा जिंकणारा भाजप आता मोठ्या भावाला मागे टाकून एकट्याच्या बळावर बहुमताच्या जवळ पोहोचला आहे, तर बाळासाहेबांचा वारसा सांगणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना केवळ २० जागांवर अडकली आहे. मात्र, आमचीच मूळ शिवसेना असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५८ जागा मिळाल्या आहेत. त्याचवेळी ठाकरे नावाचे वलय असलेली राज ठाकरेंची ‘मनसे’ एकही जागा जिंकू शकलेली नाही. यामुळे महाराष्ट्रात ‘ठाकरे’ नावाला असलेले वलय भाजपने संपुष्टात आणले, असे या निकालातून सूचित होत आहे.

भाजपच्या खेळीमुळे ठाकरे घराण्याच्या हातून शिवसेना आता निसटली असून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरीखुरी शिवसेना असल्याचा दावा आता शिंदे गट जोरकसपणे करू शकतो. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांना जे जमले नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले. शिवसेनेला ठाकरेंच्या वलयापासून दूर करून एकनाथ शिंदे यांनी आपला स्वतंत्र सवतासुभा निर्माण केला आहे. भविष्यात हे निर्माण केलेले साम्राज्य त्यांना कितपत टिकवता येईल, यावर शिंदेंच्या शिवसेनेचे भवितव्य ठरणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना आपल्या ढासळलेल्या गडाची डागडुजी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपने जशी लोकसभेच्या केवळ २ जागांवरून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली, तशी भरारी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना आपले कुठे चुकले? यावर चिंतन करावे लागणार आहे. त्यातून भविष्यातील रणनीती आखून पुन्हा आपला गड मजबूत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

दुसरीकडे ठाकरे आडनावाचा वारसा असलेल्या राज ठाकरेंची ‘मनसे’ स्थापनेनंतर प्रारंभी मिळवलेल्या यशानंतर सतत घसरणीच्याच मार्गावर आहे. सतत बदलती भूमिका, पक्षाच्या धोरणांमध्ये सातत्य नसणे यामुळे ‘मनसे’ची कामगिरी दिवसेंदिवस खालावतच चालली आहे. आता तर विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राज ठाकरेंचा करिष्मा संपल्याचेच संकेत मिळत आहेत. या निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीमुळे तर मनसेची मान्यता रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेली मान्यता टिकविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत किमान तीन आमदार व तीन टक्के मते मिळवावी लागतात, अन्यथा त्यांची मान्यता रद्द होऊ शकते. राज ठाकरेंच्या मनसेने यंदा १२३ जागा लढविल्या. पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१४ व २०१९ मध्ये मनसेचा केवळ एकेच आमदार निवडून आला होता. त्यापूर्वी २००९ मध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. मनसेला मान्यता टिकवण्यासाठी ४८ लाख मते मिळायला हवी. २०१४ मध्ये मनसेला १४.६५ लाख मते, तर २०१९ मध्ये १२.४८ लाख मते मिळाली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मनसेला किती मते मिळाली हे एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. त्यामुळे एकूणच मनसेसाठी पुढील वाटचाल अधिकच खडतर बनली आहे.

logo
marathi.freepressjournal.in