मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी बाहेर येऊ लागल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा झटका बसला. महायुतीला अनपेक्षितरीत्या २३६ जागा मिळाल्या असून भाजपला सर्वाधिक १३२ जागा, शिंदे गटाला ५७, अजित पवार गटाला ४१ जागा व अन्य ६ जागा मिळाल्या आहेत. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. ‘मविआ’त काँग्रेसला १६ जागा, ठाकरे गटाला २० व शरद पवार गटाला १० व अन्य ३ जागा जिंकता आल्या आहेत. या निकालाने ‘मविआ’चा पुरता ‘निक्काल’ लागला असून, सत्ताधारी महायुतीच जनतेत ‘लाडकी’ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. एक्झिट पोल, राजकीय पंडितांसह सर्वपक्षीय नेत्यांसाठी हे निकाल अनपेक्षित ठरले. आपला पूर्णत: सुपडासाफ होईल, असे मविआच्या नेत्यांनाही वाटले नव्हते, तर जनतेत आपण एवढे ‘लाडके’ आहोत, याची सत्ताधारी महायुतीला अपेक्षाही नव्हती. एकूण महाराष्ट्रातील जनतेच्या मतवर्षावात ‘मविआ’ला विरोधी पक्षनेत्याचे पदही मिळणे दुरापास्त झाले आहे.
छोटे-मोठे पक्ष भुईसपाट
मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडीसह अनेक छोटे-मोठे पक्ष भुईसपाट झाले आहेत. सत्ताधाऱ्यांना ‘लाडक्या बहिणीं’नी चांगलीच भाऊबीज भेट दिल्याचे मतमोजणीतून दिसून आले आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे मुस्लिम महिलांची मतेही महायुतीकडे वळल्याचे चित्र आहे. महायुतीच्या विविध लाडक्या योजनांमुळे लोकसभेच्यावेळी असलेले महायुती विरोधातील चित्र पूर्णत: पालटले असून विरोधी पक्ष भुईसपाटच झाले आहेत.
मविआची ४९ जागांवर बोळवण झाल्याने ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा मविआने चर्चेत आणला आहे. अनेक मतदारसंघात मातब्बर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हितेंद्र ठाकूर, बाळा नांदगावकर, नवाब मलिक, राजेश टोपे यांचा समावेश आहे. तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, धनंजय मुंडे, नाना पटोले आदी दिग्गज विजयी झाले आहेत.
आता मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता?
महायुतीच्या दमदार विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा दणदणीत विजय मिळाल्याने शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे, असा शिंदे गटाचा दावा आहे. तर भाजप जागांच्या बाबतीत बहुमताजवळ पोहोचले असल्याने मुख्यमंत्री भाजपचा असावा म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे भाजपचे म्हणणे आहे. अजित पवार गट सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही.
महायुतीचा शपथविधी सोमवारी वानखेडेवर
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा कौल मिळाला. त्यामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण, याबाबत उद्या (सोमवार) दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडणार असून त्याची तयारी करण्याचे निर्देश महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या सोहळ्याला देशभरातील बडे नेते, अभिनेता, बड्या उद्योगपतींची उपस्थिती असणार आहे.