
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आधी एक्झिट पोल मध्ये कोणालाच बहुमत मिळणार नाही, असे स्पष्टपणे दाखवले होते. मात्र शनिवारी सकाळी १० नंतर निकाल एकतर्फी होत गेला आणि महायुतीला २३५ हून अधिक जागांवर विजय मिळविला. त्यामुळे अचानक निकालाचा ट्रेंड कसा बदलला याबाबत साशंकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. जनतेने महायुतीला भरघोस मतदान केले नसून हा ईव्हीएमचा घोटाळा आहे, असा घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मविआने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला असता तर नक्कीच मविआला फायदा झाला असता असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. नेहमीच गजबजलेले दादर येथील शिवसेना भवनात शुकशुकाट पसरला होता.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. कोण बहुमत गाठणार याचा विश्वास महायुतीतील नेत्यांना नव्हता. एक्झिट पोलमध्ये ही कोणालाच बहुमत मिळणार नाही, असे दाखवले. तरीही ६५ ते ७० जागा मिळणाऱ्या भाजपने १३७ हून अधिक जागांवर विजय मिळविला. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५६ हून अधिक जागांवर विजय मिळविला. अजित पवार यांच्या पक्षाला ४० हून अधिक जागांवर विजय मिळविला. विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राज्यभरात दौरे केले, ग्राऊंड झीरोवर काम केले, त्यावेळी लोकांनी महायुतीबद्दल नाराजीच्या भावना व्यक्त केल्या.