'मविआ'त ठिणगी! पत्रकार परिषदेत नाना पटोले संतप्त, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस-ठाकरे गटात वाद

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचे गुरुवारी 'मविआ'ने अगदी वाजतगाजत जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवारी 'मविआ' मध्ये जागावाटपावरून ठिणगी उडाल्याने विधानसभा निवडणुकीला आता खरी रंगत येऊ लागल्याचे दिसून येत आहे.
'मविआ'त ठिणगी! पत्रकार परिषदेत नाना पटोले संतप्त, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस-ठाकरे गटात वाद
Published on

मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचे गुरुवारी 'मविआ'ने अगदी वाजतगाजत जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवारी 'मविआ' मध्ये जागावाटपावरून ठिणगी उडाल्याने विधानसभा निवडणुकीला आता खरी रंगत येऊ लागल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने शिवसेनेच्या काही जागांवर दावा केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र काँग्रेस जागावाटपाबाबत सक्षम नसल्याचे वक्तव्य केले अन् त्यावरून राऊत व पटोले यांच्यात चांगलीच जुंपली. त्यामुळे 'मविआ'चे जागावाटप आणखी रखडण्याची शक्यता आहे.

उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे. महाराष्ट्र काँग्रेस जागावाटपाबाबत तेवढी सक्षम नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकार परिषदेत चांगलेच संतापले. आता वेळ खूप कमी आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत, असे मला वाटते. त्यांना वारंवार दिल्लीत लिस्ट पाठवावी लागते, मग चर्चा होते. आता ती वेळ निघून गेली आहे. आमची इच्छा आहे की, लवकरात लवकर जागावाटपाचा निर्णय व्हावा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फार काही मतभेद नाहीत. काँग्रेससोबतही मतभेद नाहीत, पण काही जागा आहेत, ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष दावा करत आहे. राज्यपातळीवर काँग्रेसकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे आम्हाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत बोलावे लागेल आणि तक्रार करावी लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना माहिती देतील, त्यांची उद्धव ठाकरे यांनी नेमणूक केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक शरद पवारांनी केली आहे, तर आमची नेमणूक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांनी केली आहे. आम्ही त्यांना बैठकीची माहिती देऊ. शेवटी सर्व पक्षांचे हायकमांड निर्णय घेतील. संजय राऊत काय बोलत होते ते मला समजलेले नाही आणि तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

राऊत उद्धव ठाकरेंचे ऐकत नाहीत, तो त्यांचा प्रश्न - पटोले

राज्यातील घडामोडींची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आम्हाला द्यावी लागते. मात्र संजय राऊत उद्धव ठाकरेंचे ऐकत नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे, असा चिमटा नाना पटोले यांनी राऊत यांना काढला.

पूर्व विदर्भातील जागेचा तिढा कायम

पूर्व विदर्भात काँग्रेस बरीच वर्षे निवडणूक जिंकलेली नाही, असा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे विदर्भात अस्तित्व नाही असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस विदर्भात जागा सोडायला तयार नसल्यामुळे हा वाद विकोपाला गेला आहे.

... पण इतकेही ताणू नये की तुटेल !

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात काही वाद झाला याची माहिती घेऊन सांगतो. राजकीय पक्षात अधिक पक्ष आले तर जागावाटपाच्या चर्चेत काही अडचण येते. परंतु इतकेही ताणू नये की तुटेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नाव न घेता दिला.

पटोले असतील तर बैठक होणार नाही ठाकरे गट

महाविकास आघाडीत काही जागांचा वाद आता विकोपाला गेला आहे. मविआच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, तर यापुढे बैठक होणार नाही, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे. मात्र पटोले यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in