आता विधानभवनात मंत्री, अधिकाऱ्यांनाच प्रवेश; विधिमंडळात मंत्र्यांना बैठका घेण्यास मनाई, हाणामारीमुळे अभ्यागतांना ‘नो एंट्री’

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते गुरुवारी विधानभवनात भिडल्याचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळात उमटले.
आता विधानभवनात मंत्री, अधिकाऱ्यांनाच  प्रवेश; विधिमंडळात मंत्र्यांना बैठका घेण्यास मनाई, हाणामारीमुळे अभ्यागतांना ‘नो एंट्री’
Published on

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते गुरुवारी विधानभवनात भिडल्याचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळात उमटले. यापुढे होणाऱ्या अधिवेशनात मंत्री, मंत्र्यांचे स्वीय सहायक, अधिकारी यांनाच प्रवेश असणार आहे. तसेच मंत्र्यांनी बैठक मंत्रालयात घ्यावी, विधानभवनात बैठकीचे आयोजन करु नये, असे फर्मान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी काढले. तसेच अधिवेशन काळात अभ्यागतांना विधानभवनात प्रवेश नसेल, असे अध्यक्षांनी जाहीर केले.

पावसाळी अधिवेशनात गुरुवारी विधानभवनातील लॉबीत झालेल्या हाणामारीचे पडसाद शुक्रवारी उमटले. याप्रकरणी या दोघांची पोलीस चौकशी सुरू आहे.

नितीन देशमुख, बबन टकले या दोघांचे वर्तन विधानभवनाची प्रतिष्ठा मलिन करणारे आहे. नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नितीमूल्य समिती स्थापन करण्याचे विचाराधीन आहे. लवकरच सभापतींशी चर्चा करून आणि गटनेत्यांशी संपर्क करुन पुढील एक आठवड्यात निर्णय घेण्यात येईल. अधिवेशन काळात विधिमंडळात सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहायक आणि शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल, अभ्यांगताना प्रवेश देण्यात येणार नाही, असा महत्वाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केला.

दोघांचे प्रकरण विशेष समितीकडे वर्ग

मला सुरक्षा रक्षकांचा जो अहवाल प्राप्त झाला आहे, त्यानुसार या हाणामारीमुळे या दोघांनी विशेष अधिकाराचा भंग व अवमान केला आहे. त्यांच्याविरोधात विशेष अधिकार भंग व अवमान चौकशी करून मी हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

विधानभवनात चोख सुरक्षा बंदोबस्त

गुरुवारी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. या प्रकरणामुळे विधानभवनाची प्रतिमा मलीन झाली असून यापुढे अशा घटना टाळण्यासाठी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सभागृहात केली.

logo
marathi.freepressjournal.in