

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या शिस्तभंग समितीने पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीचा आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात पडळकर व आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाच्या शिक्षेची शिफारस केल्याची माहिती आहे. त्यामुळे हे प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषीकेश टकले व शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली होती. गोपीचंद पडळकरांकडून शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर होणाऱ्या अश्लाघ्य टीकेतून ही घटना घडली होती. विधानभवनाच्या लॉबीतच हा प्रकार घडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात होता. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता चौकशी समितीने आपला अहवाल सभागृहाला सादर केला आहे.
या अहवालात ऋषीकेश टकले व नितीन देशमुख या दोघांनाही तुरुंगवासाच्या शिक्षेची शिफारस केल्याची माहिती आहे. शिफारशीचा अंतिम निर्णय सभापती व अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील १-२ दिवसांत हा मुद्दा अध्यक्ष व सभापतींकडून आपापल्या सभागृहात मांडला जाणार असल्याची शक्यता आहे.
पक्षपातीपणा झाल्यास विरोध करणार - शरद पवार गट
दुसरीकडे, शिस्तभंग समितीच्या अहवालात पक्षपातीपणा झाल्यास त्याचा तीव्र विरोध केला जाईल असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. विधिमंडळात झालेल्या हाणामारी प्रकरणात शिस्तभंग समिती जो काही अहवाल सादर करेल त्याचे आम्ही स्वागत करू. पण त्यात पक्षपातीपणा असल्याचा त्याचा विरोध केला जाईल. सताधारी आमदार, मंत्री विनापास येणार असतील तर अध्यक्षांनी सर्व नियम शिथील करावेत. हे चुकीचे आहे. सभागृहातही हा विषय येईल. अर्थपूर्ण कारणांसाठी कोण येते व कोण नाही हे सर्वश्रूत आहे. सत्ता कुणाचीही असो हे ठराविक लोक तुम्हाला दिसणारच. यावर संबधित यंत्रणेने योग्य ती कारवाई करायला हवी, असे शिंदे म्हणाले.