जरांगेंचा बोलविता धनी कोण? आता ‘एसआयटी’ घेणार शोध; सर्वंकष चौकशीचे विधानसभा अध्यक्षांचे सरकारला निर्देश

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छेडलेल्या आंदोलनाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी दिले.
जरांगेंचा बोलविता धनी कोण? आता ‘एसआयटी’ घेणार शोध; सर्वंकष चौकशीचे विधानसभा अध्यक्षांचे सरकारला निर्देश

मुंबई : मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छेडलेल्या आंदोलनाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी दिले. ‘महाराष्ट्र बेचिराख होईल’ या जरांगे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती असल्याने या आंदोलनाची ‘एसआयटी’ चौकशीची मागणी भाजपच्या आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. याबाबतचे षड् यंत्र आता बाहेर येत आहे. या मागचा बोलविता धनी कोण आहे हे शोधून काढले पाहिजे. पुणे, संभाजीनगर, नवी मुंबईत वॉर रूम कोणी उघडल्या याचीही आम्हाला माहिती आहे. याबाबतची सर्व चौकशी करून हे षड् यंत्र बाहेर काढण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलाईनमधून विष देऊन आपल्याला संपवण्याचा कट रचला असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी केला होता. जरांगे यांच्या या आरोपांचे आणि त्यांच्या वक्तव्यांचे पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मराठा आंदोलनाच्या बाबतीत दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, अशी टिप्पणी सोमवारी केली होती. तो दाखला देत आशिष शेलार म्हणाले, मराठा समाजाच्या भावना आणि मागण्यांबाबत सर्वांचेच एकमत आहे, पण महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार? ही केवळ धमकी आहे की त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.

कोपर्डी घटनेतील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन दगड मारा, असे सांगितल्याचा मराठा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यातील ऋषिकेश बेदरे याच्याकडे गावठी पिस्तूल सापडले. प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र म्हस्के यांची घरे जाळली गेली. त्यामुळे याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी शेलार यांनी केली. या सभागृहाचे कोण सदस्य या कटकारस्थानामध्ये होते, कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या, याचा खुलासा झाला पाहिजे, त्यांना अटक करा, अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली.

विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशांचे पालन करू -फडणवीस

एसआयटी स्थापन करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार आहे. कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत. या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील? तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देत आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच. मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल. अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in