आजच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Maharashtra Assembly Winter Session) महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गाजत असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सिल्लोडमधील कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला. यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. तसेच, विधिमंडळाबाहेर विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणा देत त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली.
अजित पवार म्हणाले की, "अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात आहे. यासाठी तिकिटे छापण्यात आली आहेत. त्यासाठी काही दरही ठरवण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा अधिक तालुके आहेत, त्या ठिकाणी प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आली आहेत. यासाठी २५ हजार रुपये दर ठरवला गेला आहे. तर इतर प्रवेशिकांचे ५ हजार, ७.५ हजार आणि १० हजार दर ठरवण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींचे पुरावे माझ्याकडे आहेत."
याशिवाय अजित पवार पुढे म्हणाले की, " एवढंच नव्हे तर अब्दुल सत्तार हे मागच्या सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील ३७ एकर सरकारी जमीन वाटप करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरही भूखंड वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला भूखंड वाटप केल्याचा प्रकार जनहित याचिकेत उघड झाला. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा," अशी मागणी यावेळी त्यांनी केली.