

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अनेक खुलासे केले. तसेच, होणाऱ्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा होती. हा दबाव राजकीय होता का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. श्रद्धाने तुळींज-नालासोपारा पोलिसांमध्ये दाखल केलेली तक्रार मागे घेतली. यासाठी पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नव्हता," असे स्पष्टपणे सांगितले.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "श्रद्धा वालकरच्या वडिलांची आणि माझी भेट झाली होती. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम मला सांगितला. दरम्यान, श्रद्धाने तक्रार केली होती आणि त्यानंतर एका महिन्याने अर्ज मागे घेतला होता. आम्ही आता त्या एक महिन्यात पोलिसांनी काय करवाई केली? याची चौकशी करत आहोत. आम्ही पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखली समिती नेमली आहे." २३ नोव्हेंबरला श्रद्धाला मारहाण झाली होती. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पण मग एक महिने पोलीस काय करत होते? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार उपस्थित केला. या सर्व घडामोडींवर एक विशेष पथक तयार करुन चौकशी केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.