अडीच महिन्याच्या लहान बाळाला घेऊन आमदार अधिवेशनाला; कोण आहेत सरोज अहिरे?

हिवाळी अधिवेशनाला पहिल्याच दिवशी आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजर राहणाऱ्या आमदार सरोज अहिरे आहेत तरी कोण?
अडीच महिन्याच्या लहान बाळाला घेऊन आमदार अधिवेशनाला; कोण आहेत सरोज अहिरे?

नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी नेहमी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांशिवाय आणखी एका कारणामुळे हा पहिला दिवस चर्चेत राहिला. ते कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह अधिवेशासाठी हजर राहिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. याबद्दल माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेऊन दोघांचीही चौकशी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "मी आई आहेच, सोबत आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत."

आमदार सरोज अहिरे म्हणाल्या की, "मी आई तर आहेच, शिवाय मी आमदारही आहे. त्यामुळे दोन्हीही कर्तव्ये माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही. पण, मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत. म्हणून मला बाळाला घेऊन यावे लागले." तर राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासू कल्पना वाघदेखील उपस्थित होत्या.

कोण आहेत आमदार सरोज अहिरे-वाघ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे या नाशिकमधील देवळालीच्या आमदार आहेत. २०२१मध्ये त्यांचे लग्न डॉ.प्रवीण वाघ यांच्याशी झाले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवानेत्यांमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मतदारसंघात जनेतशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या ओळखल्या जातात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in