

मुंबई : राज्यभरात सध्या सुरू असलेल्या एटीएसच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशातच विदर्भातील यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली, तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी ‘एटीएस’ने छापे मारल्याची माहिती आहे. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसने सर्च ऑपरेशन राबवले आहे. त्या अनुषंगाने अनेक भागात जवळपास २१ ठिकाणी ‘एटीएस’चे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहीती आहे. सोबतच या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अत्यंत गोपनीय पद्धतीने राज्यातल्या अनेक ठिकाणी एटीएस पथकाकडून चौकशी सुरु आहे. स्थानिकांच्या घरांत जाऊन लोकांची चौकशी केली जात आहे. मात्र कारवाईत पथकाने अद्यापपर्यत कुणालाही ताब्यात घेतलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर एटीएससह तपास यंत्रणांनी कारवाईला सुरुवात केली. कारवाई सुरू असताना यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यात २० पथके दाखल
राज्यात शनिवार रात्रीपासून अनेक भागात एटीएसची गोपनीय कारवाई सुरू आहे. विदर्भातही ४ ते ५ ठिकाणी एटीएसच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि पुसद गावात एटीएस पथकाची कारवाई सुरू आहे, तर अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्यांतर्गत काही भागातही कारवाई सुरू आहे. एटीएसची २० पथके रात्रीपासून उमरखेड आणि पुसद गावात तळ ठोकून आहे. एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह आयपीएस अधिकारी देखील हजर आहे. त्यामुळे या कारवाईत नेमके काय घडतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.