

मुंबई : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यातील शासकीय वसतिगृहे आणि शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता दररोज २०० मिली सुगंधी दूध टेट्रा पॅक स्वरूपात मिळणार आहे.
यासाठी राज्यस्तरीय ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून दूध पुरवठ्याची अंमलबजावणी १५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. सामाजिक न्याय विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची राज्यात ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून, त्यांची एकूण प्रवेश क्षमता ४६ हजार ६६३ विद्यार्थी इतकी आहे. याशिवाय अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला-मुलींसाठी ९२ शासकीय निवासी शाळा सुरू असून, त्यांची प्रवेश क्षमता १८ हजार ६०० विद्यार्थ्यांची आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार देण्याच्या व्यवस्थेचा भाग म्हणून दूध पुरवठा करण्यात येणार आहे.
सध्या विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दूध, दोन वेळचे जेवण, उकडलेली अंडी, शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी कॉर्न फ्लेक्स, दररोज एक सफरचंद तसेच ऋतुमानानुसार एक फळ देण्यात येते. त्यामध्ये आता टेट्रा पॅकमधील सुगंधी दुधाची भर पडली आहे. त्यानुसार पराग मिल्क फूडला मुंबई, नाशिक, पुणे आणि लातूर विभागातील तर श्री वारणा संघ लिमिटेडला नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील वसतिगृहे आणि निवासी शाळांसाठी दूध पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तीन वर्षांसाठी योजना
विद्यार्थ्यांना सुगंधी दूध पुरवठ्याचा कालावधी तीन वर्षांचा राहणार असून या कालावधीत मंजूर केलेल्या २६ रुपये ४० पैसे या दरात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. दुधाच्या गुणवत्तेबाबत विभागाने कडक अटी घातल्या असून निविदेतील अटी आणि शर्तींचा भंग केल्यास संबंधित पुरवठादाराला दंड करण्यात येणार आहे. याशिवाय पुरवठादाराने मध्येच दूध पुरवठा बंद केल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई होणार आहे.