

नवी दिल्ली : जगभरातून भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांसाठी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरले आहे.गेल्या तीन वर्षांत राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये महाराष्ट्रात १५ लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली होती, हा आकडा नंतर चांगलाच वाढला व २०२४ मध्ये तो ३७ लाखांहून अधिक झाला असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे जागतिक आर्थिक केंद्र मानले जाते, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही मुंबईचा जगभरात लौकिक आहे. मुंबई पाहण्यासाठी, येथील पर्यटनासाठी जगभरातून पर्यटक येता असतात. मुंबईचे मार्केट असो किंवा, मुंबईचे प्रवेशद्वार असलेले ‘गेट वे ऑफ इंडिया’ असो. येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. यासह, निसर्गरम्य कोकण, जगप्रसिद्ध अजंठा, वेरुळच्या लेण्या आणि ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड - किल्ले हे पर्यटकांची पसंती असते. म्हणूनच, येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते.
पर्यटन मंत्रालयाकडून विविध उपक्रम
जागतिक स्तरावर भारताला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शने, परदेशी टूर ऑपरेटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सहली, रोड शो आणि भारतीय खाद्य महोत्सवांचा समावेश आहे. हे सर्व प्रयत्न विविध राज्य सरकारे आणि भारतीय दूतावासांच्या मदतीने केले जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आर्थिक मदत
केंद्र सरकारकडून पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 'स्वदेश दर्शन २.०' आणि 'प्रसाद' सारख्या योजनांतर्गत आर्थिक मदत दिली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास आणि आध्यात्मिक वारसा स्थळांच्या संवर्धनावर भर दिला जातो. महाराष्ट्रातील पर्यटन विकासासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नियमितपणे चर्चा आणि समन्वय बैठका घेतल्या जातात, ज्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळत आहे.
देशात पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक
मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील परदेशी पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. २०२२ मध्ये १५.२ लक्ष असलेला हा आकडा २०२३ मध्ये थेट ३३.८ लाखांवर गेला आणि २०२४ मध्ये तो ३७ लाखांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी १७.६९ टक्के पर्यटकांनी महाराष्ट्राला पसंती दिली असून, पर्यटनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे.