

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त ३० हजार २०९ शिक्षण सेवक तसेच शिक्षक पदांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी गुरुवारी दिली.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) -२०२५ ऑनलाइन पद्धतीने २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या चाचणीसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले असून १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५१, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४, नगर पालिका/ परिषदांच्या २८० तसेच खासगी शैक्षणिक संस्थांच्या १२ हजार १४८, याशिवाय आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील २ हजार ४२१ आणि शासकीय विद्यानिकेतन मधील ५६ अशा एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती मागणी नोंदविण्यात आली आहे. यामधील १९ हजार ८८१ पदे मुलाखतीशिवाय तर खासगी संस्थांमधील १० हजार ३२८ पदे मुलाखतीसह भरावयाची आहेत, असे सिंह यांनी सांगितले.
या पदांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या १४ हजार ३२० पदांचा, इयत्ता सहावी ते आठवीच्या १० हजार १२ पदांचा, इयत्ता नववी आणि दहावीच्या ५ हजार ५१३ पदांचा तर इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या ३६४ पदांचा समावेश आहे.
उमेदवारांना पदभरतीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी आवश्यक सुविधा ६ ऑगस्ट २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत लॉक करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांसाठी गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले.