Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

महायुतीने २९ पैकी २३ मनपा आपल्या खिशात टाकत दमदार कामगिरी केली आहे. कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत, जळगावपासून जालन्यापर्यंत भाजपने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा
Published on

राज्यात ८ ते ९ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर झालेल्या मनपा निवडणुकीत राज्याच्या बहुतांश महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीने २९ पैकी २३ मनपा आपल्या खिशात टाकत दमदार कामगिरी केली आहे. कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत, जळगावपासून जालन्यापर्यंत भाजपने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. भाजपच्या या झंझावातासमोर विरोधी पक्ष गलितगात्र झाल्याचे चित्र आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मुसंडी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) निर्विवाद वर्चस्व राखत मोठी मुसंडी मारली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत १६५ पैकी ११८ जागांवर, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२८ पैकी ८४ जागांवर भाजपने आघाडी घेत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकजुटीचा प्रयोग पुण्यात फोल ठरल्याचे चित्र असून, या निकालाने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

पुणे मनपा एकूण जागा - १६५

  • भाजप - १२३

  • रा. काँग्रेस (अप) - २१

  • काँग्रेस - १६

  • रा.काँग्रेस (शप) - ०३

पिंपरी-चिंचवड एकूण जागा - १२८

  • भाजप - ८४

  • रा. काँग्रेस (अप) - ३७

  • शिवसेना - ०६

  • अन्य - ०१

नागपुरात भाजपचा दणदणीत विजय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमपीच असलेल्या नागपुरात भाजपने १५१ पैकी ९७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे नागपुरात भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामामुळे व भक्कम संघटनेमुळे हा विजय मिळाला आहे.

कोल्हापूरमध्ये महायुतीला कौल

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने अनेक महत्त्वाच्या प्रभागांत विजय मिळवत आपली ताकद दाखवली, तर दुसरीकडे काँग्रेसने शहरात सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळवला.

परभणीत महायुतीचा वारू रोखला

परभणी महापालिकेत भाजप महायुतीचा वारू उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने रोखला आहे. पहिल्यांदाच परभणी महापालिकेवर थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. या अगोदर फक्त २००७ ला शिवसेनेचा नगराध्यक्ष होता. परभणी मनपा निवडणुकीतील ६५ पैकी २५ जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आल्या आहेत. तर काँग्रेस १२, भाजप १२, अजित पवारांची राष्ट्रवादी ११, जनसुराज्य पक्ष ३, यशवंत सेना १ आणि १ अपक्ष निवडून आले आहेत.

जळगावमध्ये महायुतीला बहुमत

जळगाव महापालिकेत ७५ जागांपैकी ६९ जागा महायुतीने सहज जिंकल्या. या यशाचे श्रेय हे गिरीश महाजन यांना दिले जात आहे. तसेव जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी घेतलेल्या मेहनतीला दिले जाते.

छ. संभाजीनगरमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता

संभाजीनगर मनपात भाजप ५७ जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या स्थानावर आला असून, एमआयएमने तिसरे स्थान पटकावले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या ११५ जागांपैकी १०० जागांचा निकाल समोर आला आहे. भाजपने ५८ जागांवर आघाडी घेतली होती.

नांदेड वाघाळा महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत अखेर खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ८१ पैकी ४५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. त्या पाठोपाठ एमआयएम १३ आणि काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने १७ जागा मिळवत विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस निर्माण केली आहे. दोन आमदार असलेल्या शिवसेनेला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अप) केवळ २ जागा मिळवता आल्या आहेत.

चंद्रपुरात काँग्रेसने सत्ता राखली

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सत्ता राखण्यात यश आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या होमपीचवर भाजपला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे मात्र विजय वडेट्टीवारांनी काँग्रेसचा गड राखला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, जवळ जवळ २७ जागांवर आम्हाला विजय मिळाला आहे.

२९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

  • मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली-मिरज कुपवाड, सोलापूर, अहिल्यानगर, नांदेड वाघाळा, जळगाव, जालना, अकोला, धुळे, इचलकरंजी, अमरावती या २० महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष

  • ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदे गटाची सरशी

  • केवळ परभणी महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता येणार

  • हितेंद्र ठाकूरांनी वसई - विरारचा गड राखला

  • लातूर, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूरमध्ये कॉंग्रेसची सरशी

  • मालेगावमध्ये ‘इ्स्लाम’ पक्षाची अनपेक्षित घोडदौड

  • राज्यात ओवेसींच्या ‘एमआयएम’ची मुसंडी, ९५ उमेदवार विजयी

logo
marathi.freepressjournal.in