उद्यापासून भाजपचे 'गाव चलो' अभियान! फडणवीस, गडकरींसह सर्व प्रमुख नेते गावात पोहोचणार, एक दिवस मुक्कामी राहणार

भाजप हा कायम इलेक्शन मोडवर असणारा पक्ष समजला जातो. आगामी लोकसभा निवडणुका भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत.
उद्यापासून भाजपचे 'गाव चलो' अभियान! फडणवीस, गडकरींसह सर्व प्रमुख नेते गावात पोहोचणार, एक दिवस मुक्कामी राहणार

मुंबई : भाजप हा कायम इलेक्शन मोडवर असणारा पक्ष समजला जातो. आगामी लोकसभा निवडणुका भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच आता ग्रामीण भागासाठी 'गाव चलो' अभियान, तर शहरी भागासाठी वॉर्डस्तरावरील अभियानाची घोषणा भाजपने केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते संबंधित गावात २४ तास ठाण मांडणार असून संघटनात्मक बैठकांसोबतच स्थानिकांसोबतच्या संवादाचा कार्यक्रम नक्की करण्यात आला आहे. ५० हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण ३.५ लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे.

प्रत्येक गावात पोहोचणार नेते

नितीन गडकरी - धापेवाडा (ता. कळमेश्वर, नागपूर )

देवेंद्र फडणवीस - पारडसिंगा (नागपूर)

रावसाहेब पाटील-दानवे - वालसावंगी (जालना)

चंद्रशेखर बावनकुळे - साऊर (अमरावती)

आशिष शेलार - गुरामवाडी (ता. मालवण, सिंधुदुर्ग)

येत्या ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत राज्यभरात हे अभियान राबविले जाणार आहे. केंद्रासह राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री आणि प्रमुख नेते २४ तास एका गावात राहणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दादर येथील पक्ष कार्यालयात भाजपच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी गाव चलो अभियानाची माहिती दिली. यावेळी आमदार योगेश सागर, पराग आळवणी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' राबविण्यात येणार आहे.

या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार हे त्यांना नेमून दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागील १० वर्षांतील प्रभावी कार्य, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्तता, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरंटी काय आहे, हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारच्या योजना, कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरीत करण्यात येणार आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

शहरी भागातही वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. पीयूष गोयल, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री या अभियानात सहभागी होणार आहेत. केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विलेपार्ले येथे या अभियानात सहभागी होतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. या जनसंपर्क अभियानांत भाजपचे प्रवासी नेते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार-आमदार, जि.प. सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी राज्यभरातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील. त्यांना ३२ हजार सुपर वॉरियर्सचे सहकार्य मिळेल. प्रत्येक युनिटमध्ये भाजपचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा, अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे करेल.

logo
marathi.freepressjournal.in