

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान यंदा सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने सामूहिक कॉपीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १०३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. यंदाच्या दहावी-बारावी परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस येत असून परीक्षा केंद्रांतील दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित केले जात आहे.
बारावी परीक्षेत बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्रमांक २२४) येथे सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. १० फेब्रुवारी रोजी पहिल्याच पेपरदरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनाने १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय (केंद्र क्रमांक ००७९) येथेही 'मास कॉपी'चा प्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असल्याचे दिसून आल्याने २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी २१ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंद्र क्रमांक ०४३९, ०४२३ आणि ०४२१ येथे इंग्रजीच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यांकडून कॉपी करताना आढळून आले. या प्रकरणी नियुक्त पाच पर्यवेक्षक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील जुमडा फाटा येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्रमांक ९०६) येथे १६ फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्राच्या परीक्षेत तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे निदर्शनास आले.
प्रयोगशाळा परिचराकडे मोबाईल आढळल्याने तीन संस्थांतील सहा शाळांमधील २७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
तसेच बीड जिल्ह्यातील यशवंत विद्यालयाचे केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक ए. एम. राऊत यांनाही निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ब्रोमनवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्रमांक ६१५) येथे राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये मायक्रोनोट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरून काढलेले मुद्रित साहित्य वापरून सामूहिक कॉपीचा प्रकार आढळला. या प्रकरणी तीन शिक्षक व एका शिपायावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रात डमी विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षिका तसेच संबंधित विद्यार्थी आणि तोतया विद्यार्थी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून केंद्रप्रमुख व पर्यवेक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सलगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल (केंद्र क्रमांक ३९३) येथे रसायनशास्त्राच्या पेपरदरम्यान नऊ विद्यार्थी गैरमार्ग करताना आढळले. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांकडे मोबाईल सापडले. या प्रकरणी संबंधित संस्थेतील तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या आणखी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात अनेक गैरप्रकार
आप्पास्वामी विद्यालय, शेंदूर्जाना आढाव केंद्र येथे दोन विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. या प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. वाघामायदेवी आदिवासी आश्रमशाळा, रुईगोस्ता केंद्र येथे १७ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले. याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. श्री वसंतराव नाईक विद्यालय येथे एका विद्यार्थ्याकडे मोबाईल फोन आढळल्याने तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर विद्यालय, मांडवा केंद्र येथे २१ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले असून सात कर्मचारी निलंबित करण्यात आले. बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे सहा विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. याप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले. श्री शेषराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, लेहणी परीक्षा केंद्र येथे २५ विद्यार्थी सामूहिक कॉपी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले असून या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.