दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी, तर दहावीची २० फेब्रुवारीपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
Published on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे, तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत चालेल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, दि. १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षांचा समावेश असेल.

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (दहावी) लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, १८ मार्च २०२६ पर्यंत संपतील.

लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. बारावी प्रात्यक्षिक परीक्षा ‘एनएसक्यूएफ’अंतर्गत व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसह, प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ ते सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजित केले जातील. यात माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचादेखील समावेश आहे.

दहावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालतील. यामध्ये शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश असेल.

दरम्यान, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी दोन्ही फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे तारखा विचारात घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश शिक्षण मंडळाने दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in