
मुंबई : राज्यात तब्बल ११ वर्षांनंतर मद्याच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात परराज्यातून बेकायदा दारु आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवा , दमण, मध्य प्रदेश या राज्यातून बेकायदा मद्य आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील बॉर्डर वर फ्लाईंग स्काॅडच्या टीम तैनात असून राज्यात ठिकठिकाणी चेक पोस्ट कार्यरत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांनी दैनिक नवशक्ति शी बोलताना सांगितले.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आर्थिक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने दारुच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात देशी महाराष्ट्र मेड, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विदेशी मद्य यात वाढ करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत २५ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा होत होता. परंतु मद्याच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णयाने आता वर्षांला ४० हजार कोटींचा महसूल जमा होणार आहे.
तेलंगणा, कर्नाटकच्या तुलनेत राज्यात दर कमी
राज्यात तब्बल ११ वर्षांनंतर दारुच्या किंमतीत वाढ केली असून तेलंगणा कर्नाटकच्या तुलनेत राज्यात दारुचे दर कमी आहेत. विशेष म्हणजे देशभरात दारु विक्री करुन दारु उत्पादक महसूल मिळवतात, त्यापैकी ५० टक्के महसूल महाराष्ट्र राज्यातून मिळतो.